आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्परने चिरडल्यामुळे दोघे ठार, दोघे गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुडरुवाडी, टेंभुर्णी - गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा वाहन न मिळाल्याने मोडनिंब बसस्थानकासमोरील रस्त्यावर झोपलेल्या चौघांना टिप्परने चिरडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. उपळाई (बु., ता. माढा) येथील रहिवासी असलेले हे चौघेही ज्योतिबाच्या यात्रेवरून गुरुवारी रात्री उशिरा मोडनिंबला पोहोचले होते.

तुषार बाळू गाडेकर (वय 13), महेश शंकर झुंजारे (वय 22, रा. उपळाई बु., ता. माढा) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. केशव किसन गाडेकर (18) व केशव रमेश फुगे (18, दोघेही रा. उपळाई बु.,. ता. माढा) हे जखमी झाले आहेत. कोल्हापूर येथील ज्योतिबाच्या यात्रेवरून हे चौघे गुरुवारी रात्री रेल्वेने मोडनिंबला आले होते. रात्री उशिरा पोहोचल्यामुळे गावाकडे जाण्यासाठी वाहन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे चौघेही बसस्थानकासमोर झोपले. या ठिकाणी सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी भराव टाकला जात अहे. त्या भरावावरच चौघेजण झोपले होते.

गुरुवारी पहाटे बसस्थानकासमोर उभा टिप्पर (एमएच 6 एक्यू - 5745) मागे घेताना या चौघांच्या अंगावर गेला. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. टेंभुर्णी पोलिसांनी अपघातस्थळाला भेट दिली. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक निगुडकर तपास करीत आहेत. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर उपळाई गावावर शोककळा पसरली.