आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरसाठी निघालेला गुटखा पकडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - कर्नाटकातून टेम्पोमधून पंढरपूरकडे नेत असलेला नऊ लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडला. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पाठखळ-आंधळगाव रस्त्यावर ही कारवाई केली. टेम्पोसह एकूण साडेअकरा लाखांचा माल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तीनजणांना पोलिसांनी अटक केली आहे. गजानन ज्ञानेश्वर लाड (वय 28) प्रमोद वैजीनाथ गायकवाड (33), गणेश विलास पंडित (वय 27, सर्व रा. पंढरपूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून टेम्पोमधून पंढरपूरकडे गुटखा नेला जात असल्याची खबर पोलिस व अन्नसुरक्षा अधिका-यांना मिळाली. त्यानुसार या पथकाने बोराळे नाका परिसरात सापळा लावला. मात्र, याचा सुगावा गुटखा घेऊन निघालेल्यांना लागल्याने त्यांनी आपला मार्ग बदलला. टेम्पो येत नसल्याचे पाहून पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनीही आपली जागा बदलून पाठखळ-आंधळगाव रस्त्यावर सापळा लावला. काही वेळात एक छोटा टेम्पो (एम एच 13 ए एन 9132) आला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बालाजी शिंदे, प्रकाश यादव, बिभीषण मुळे, गणपती कोकणे, अशोक कोळी, सुहास मोरे, साहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी काळे, हवालदार तात्या कुलकर्णी, मुन्ना केंगार यांनी टेम्पोची झडती घेतली. त्यावेळी त्यात एकूण आठ लाख 35 हजारांचा गुटखा व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पंढरपूर येथील त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता तेथे 70 हजार 510 रुपये किमतीचा गुटखा सापडला. तो पोलिसांनी जप्त केला.महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे. शेजारच्या कर्नाटकात गुटखा विक्री सुरू आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील गुटखा व्यावसायिक घेत आहेत.

फोटो - चडचण (ता. इंडी, जि. विजापूर) येथून पंढरपूरकडे निघालेला गुटख्याचा टेम्पो. तसेच पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचे पथक. छाया : शिवाजी पुजारी