आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आज चर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या 2013-14च्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या गुरुवारी होणार्‍या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. समितीची 13 मार्चची सभा तहकूब झाली होती. ती होत आहे. त्याचे पत्रक नगरसचिव ए. ए. पठाण यांनी काढले आहे. समितीच्या मंजुरीनंतर 28 मार्चला महापालिकेची सभा बोलावता येईल.
दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी 28 मार्चला अंदाजपत्रकाची सभा बोलावण्याची सूचना सभागृह नेते महेश कोठे यांना केली आहे. या तारखेस सभा बोलावण्यात तांत्रिक अडचण नसली तरी महापौर अलका राठोड व र्शी. कोठे यांचा होकार आवश्यक आहे.

करवाढ नसताना उशीर
महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी यांच्याकडे 12 फेब्रुवारी रोजी अंदाजपत्रक सादर केले होते. त्यास महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. कोणताही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. तरीही समितीकडून अंदाजपत्रकास मंजुरी मिळण्यास उशीर होत आहे.
कासवगतीने बैठका
अंदाजपत्रकसंदर्भात पक्ष नगरसेवकांच्या बैठका संथगतीने सुरू आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या या बैठकांमध्ये अंदाजपत्रकविषयी तपशील समजून घेण्यात येत आहेत. काँग्रेसच्या बैठकीत अंदाजपत्रकातील जमा बाजूचे वाचन सुरू असल्याची माहिती स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी यांनी सांगितले. तर 21 मार्चपर्यंत उपसूचना तयार करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले.
नगरसेवक म्हणतात..
काँग्रेस : मेघनाथ येमूल : सभा 31 मार्चच्या आधी घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन दिवस सभा होईल असे वाटते.
देवेंद्र भंडारे : नवीन सदस्यांना अंदाजपत्रक कळले पाहिजे. त्यासाठी सभा लवकर व्हावी. तशी मागणी पक्षाच्या बैठकीत करणार आहे.
अनिल पल्ली : अंदाजपत्रकाची सभा दोन दिवस घेतल्यास नव्या नगरसेवकांना बोलता येईल. तशी विनंती महापौर अलका राठोड यांना केली आहे.
परवीन इनामदार : महिला सदस्यांना रात्री 12 वाजेपर्यंत थांबावे लागणार नाही. त्यामुळे दिवसा अंदाजपत्रकची सभा घ्यावी.
विवेक खरटमल : सभा दोन दिवस घेण्यास हरकत नाही. माजी महापौर यू. एन. बेरिया सभागृह नेते महेश कोठे यांच्याशी बोलतील.
मधुकर आठवले : महापालिकेची अंदाजपत्रक सभा नियमाप्रमाणे घ्यावी.
निर्मला जाधव (राष्ट्रवादी) : अंदाजपत्रक काय असते हे कळू द्या. सभा दोन दिवस व आधी घेण्यासाठी शहरध्यक्ष महेश गादेकर यांना विनंती करणार आहे.
सुभाष डांगे : पक्षाने ठरवावे. त्यानुसार आमचे म्हणणे असेल.
विरोधी पक्ष : शोभा बनशेट्टी (भाजप) : नागरिकांना अंदाजपत्रक कळू द्या. त्यासाठी सभागृहात चर्चा घडवा.
रंजना अंबेवाले (भाजप) : अंदाजपत्रकाची सभा दोन दिवस व आधी घेण्यास हरकत नाही. मागील बजेटचे काय झाले, याची चर्चा करता येईल.
सुरेखा अंजीखाने (भाजप) : अंदाजपत्रकावर गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे. वेळेचे भान आणि महिलांची जाण ठेवावी.
मेनका चव्हाण (शिवसेना) : अंदाजपत्रकाची सभा आधी घेणे आवश्यक आहे.
महादेवी अलकुंटे (माकप) : अंदाजपत्रकाची सभा आधीच घेतली पाहिजे. त्यावर दोन दिवस व्यवस्थीत चर्चा झाली पाहिजे, या मताशी आम्ही सहमत आहोत.
पुणे महापालिकेत झाली तीन दिवस चर्चा
पुणे महापालिकेचे चार हजार कोटींचे अंदाजपत्रक आहे. स्थायी समितीकडून अंदाजपत्रक सभागृहाकडे आल्यानंतर दुसर्‍या दिवशी महापालिकेची सभा बोलावण्यासाठी पत्रक तयार करण्यात आले. दुसर्‍या दिवसापासून पाच दिवस त्यावर पक्षाच्या बैठकांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर लगेच महापालिकेची अंदाजपत्रक सभा झाली. सर्व नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळावी म्हणून तीन दिवस सभा घेतली. सकाळ ते संध्याकाळपर्यंत चर्चा झाली. 28 फेब्रुवारीला मंजुरी मिळाली. सर्वांना बोलण्याची संधी मिळाल्याने नगरसेवकांची नाराज होत नाही.’’ वैशाली बनकर, महापौर, पुणे