आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today New Gulbarga Division Formated From Solapur

सोलापूरच्‍या विभाजनातून नव्या गुलबर्गा विभागाची आज होणार निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरचे विभाजन करून नव्या गुलबर्गा रेल्वे विभागाची निर्मिती मंगळवारी (दि. 23) जाहीर होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांना याबाबत थेट विचारले असता ‘कल की राह देखिए’, असे उत्तर ‘दिव्य मराठी’ला दिले. उद्या गुलबर्गा येथे होणार्‍या जाहीर सभेत श्री. खर्गे घोषणा करतील. श्री. खर्गे मंत्रिपदी आल्यापासून गुलबर्गा विभागाच्या निर्मितीविषयी बोलले जात होते. गुलबग्र्यातील लोकांची जुनी मागणी होती. गुलबर्गा चेंबर्स ऑफ कॉर्मसने पाठपुरवा केला होता.

श्री. खर्गे सोमवारी गुलबग्र्यात आले होते. तेथील शासकीय विर्शामगृहात भेट झाली. त्यावेळी ते म्हणाले, मी आज याविषयी काही बोलणार नाही. तुम्ही उद्याची वाट बघा. उद्याच्या गुलबग्र्यातील सभेत घोषणा करणार आहे.

असा तयार होणार विभाग
गुलबर्गा विभाग तयार करण्यासाठी मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व रेल्वेचा काही भाग तोडून एकत्र केला जाणार आहे. मध्य रेल्वेतील सोलापूर विभागातील होटगीपासूनचा भाग जोडला जाईल. यात होटगी, अक्कलकोट, गुलबर्गा, वाडी आदी प्रमुख स्थानकांचा समावेश असणार आहे. याच पद्धतीने दक्षिण मध्य रेल्वेचा व हुबळीचा काही भाग तोडून गुलबर्गा विभाग तयार केला जाऊ शकतो.

सोलापूरवर परिणाम
होटगीपासूनचा भाग तोडला गेल्यास सर्वात मोठा फटका सोलापूर रेल्वे विभागाच्या उत्पन्नावर होऊ शकतो. सोलापूर विभागाला मिळणार्‍या एकूण उत्पन्नापैकी 70 टक्के हिस्सा वाडी स्थानकावरून होणार्‍या मालवाहतुकीतून मिळतो. हा भाग वगळला तर वर्षाला सोलापूर विभागास 1000 कोटींचा फटका बसू शकतो. सोलापूर रेल्वे स्थानकावर होणार्‍या विकासकामांवर परिणाम होऊ शकतो. काही प्रमाणात प्रवाशी सुविधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.


तांत्रिकदृष्ट्या अवघड
नवीन विभाग तयार करताना दोन विभागांतील अंतर विचारात घेण्यात येते. नियमाप्रमाणे दोन विभागांमध्ये किमान 300 किमीचे अंतर असावे असा आदर्श आहे. गुलबर्गा स्थानकाचे सोलापूरपासूनचे अंतर 110 किमी आहे. केवळ मालवाहतुकीचा विभाग बनतो की काय, अशी शंका आहे.

वातावरण होते तापलेले
सोमवारी गुलबग्र्यातील शासकीय विर्शामगृहात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यासाठी सोलापूरचे रेल्वे व्यवस्थापक ए. के. प्रसाद व मध्य रेल्वेचे प्रभारी सरव्यवस्थापक बी. पी. खरे हेही उपस्थित होते. सुमारे एक तास बंद खोलीत चर्चा झाली. चर्चेचा सूर गुलबर्गा विभाग होता. या बैठकीनंतर मात्र मंत्री चिडलेले दिसले. मंत्र्यांनी सरव्यवस्थापकांवर आगपाखड केल्याची माहिती मिळाली. गुलबर्गा विभागासाठी तिन्ही विभागीय सरव्यवस्थापक अनुकूल नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.


विभाग झाल्यास रेल रोको करू
गुलबर्गा विभाग तयार झाल्यास त्याचा सोलापूर विभागावर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे सोलापूर चेंबर्स ऑफ कॉर्मसचा तसेच जिल्हा प्रवासी संघ, हुंडेकरी असोसिएशनने याला विरोध दर्शवला आहे. गुलबर्गा विभाग झाल्यास आम्ही रेल रोको करू, असा इशारा चेंबर्स ऑफ कॉर्मसचे केतन शहा यांनी दिला आहे.