आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोडरोमिओंना आजपासून लागणार चोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रस्त्यावरून बेदरकारपणे गाडी चालविणे, तरुणी किंवा महिला दिसताच त्यांच्या गाडीला कट मारणे असे प्रकार करणार्‍या रोडरोमिओंना आता चाप बसणार आहे. नागमोडी गाडी चालवून इतरांच्या अपघाताला कारणीभूत ठरणे अशा रोडरोमिओंच्या कृत्याला वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन शाखेच्या संयुक्त विद्यमाने आजपासून (शुक्रवार) धडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

महिलांच्या थेट अंगावर गाडी आणल्याची भीती वाहनचालक दाखवत असेल, अथवा गाडीच्या आधारे तिला त्रास देऊन पळ काढत असेल तर पोलिस अशा रोमिओंवर जागीच कारवाई करणार आहेत. महिलांनी केवळ त्या व्यक्तीच्या गाडीचा नंबर लक्षात ठेवून 100 नंबरवर तक्रार केली तरी कारवाई होईल.

सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद
1988 मोटार वाहन अधिनियम कलम 184 नुसार वेगाने गाडी चालविणार्‍या व्यक्तीला 1000 रुपयांचा दंड किंवा 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. शिवाय काही दिवसांकरिता वाहन वापर परवाना रद्द होऊ शकतो. शिवाय, महिलेने तक्रार केली असेल तर छेडछाडीसंदर्भातील कलमान्वये कारवाई होऊ शकते.


जनतेची मदत अपेक्षित
गाडी चालकाचा महिलांना त्रास देण्याचा उद्देश असेल तर कोणीही हेल्पलाइनवर (100) फोनवरूनही तक्रार करू शकतात. पोलिस स्वत: तर कारवाई करतीलच, परंतु जनतेच्या मदतीमुळे मोहीम यशस्वी होईल. मोरेश्वर आत्राम, साहाय्यक आयुक्त


मदत करणे गरजेचे
आरटीओ कार्यालयाचे वाहतूक शाखेला यासंदर्भात मदत असतेच. महिलांच्या केसेसमध्ये अधिक संवेदनशील राहून जलद गतीने कारवाई करण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. अशोक पवार, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी


मुलींचा त्रास कमी होईल
वाटेल तशी गाडी चालवून त्रास देणार्‍यांना हा उत्तम धडा असेल. ही कारवाई कायमस्वरूपी सुरू असणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांची आणि मुलींची डोकेदुखी कमी होईल. विजयालक्ष्मी गायकवाड, विद्यार्थिनी, भारत रत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग महाविद्यालय.