आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरकरांना टोलचा 'टोला', 65 कोटी खर्चापोटी 86 कोटींची वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात एमएसआरडीसीकडून एका रेल्वे उड्डाणपूलासह 29.76 किलोमीटरचे रस्ते करण्यात आले. त्यासाठी 86 कोटी रुपये खर्च झाला. यासाठी शासनाकडून 20.33 कोटी रुपयांचे अनुदान आले तर एमएसआरडीसीने 65.65 कोटी रुपये खर्च केले. या खर्चापोटी शहरात चार टोल नाक्यांवर वाहनधारकांकडून वसुली सुरू आहे. इतकेच नाही तर पेट्रोलच्या विक्रीवर एक तर डिझेलवर तीन टक्के अधिभार लावण्यात आला. 1 जुलै 2006 रोजी वसुली सुरू करण्यात आली. आतापर्यंत टोल मक्तेदारांकडून 32 कोटी तर इंधन अधिभारातून सुमारे 54 कोटी रुपये असे 86 कोटी वसुली झाल्याचे प्राथमिक माहितीद्वारे उघड झाले आहे.

65.65 कोटी खर्चापोटी आतापर्यंत 86 कोटी वसूल झाले. खर्च केलेल्या कामापेक्षा 20.35 कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली शहरवासीयांकडून करण्यात आली, तीही खराब रस्त्यापोटी. यापुढील 21 वर्षांपर्यंत टोल आणि इंधन अधिभार असेल. सरासरी अपेक्षित चार टक्के वाढीनुसार सुमारे 390 कोटींपेक्षा अधिक वसुली शहरातून होणार आहे. रोज शहरात 80 हजार लिटर पेट्रोल तर 80 हजार लिटर डिझेल विक्री समोर ठेवून हा अंदाज बांधण्यात आला आहे.

पेट्रोलची रुपयांत वसुली अशी
शहरात रोज 80 हजार लिटर विक्री
90 पैसे प्रमाणे रोज : 72 हजार
दरमहा : 21.60 लाख
वार्षिक : दोन कोटी 59 लाख 20 हजार
मागील साडेसात वर्षांत : 19 कोटी 44 लाख

डिझेलची रुपयांत वसुली अशी
शहरात रोज 80 हजार लिटर विक्री
1.80 रुपये प्रमाणे रोज : एक लाख 28 हजार
दरमहा : 38.40 लाख
वार्षिक : चार कोटी 60 लाख 80 हजार
मागील साडेसात वर्षांत : 34 कोटी 56 लाख

महापालिकेकडे नाही नोंद
शहरात रोज किती इंधन विक्री होते याची नोंद महापालिकेकडे नाही. एलबीटीपोटी वसुली किती होते, याची माहिती नाही. इंधनाची एलबीटी वसुली कंपन्याकडून येईल तेच गृहित धरून स्वीकारले जाते. इंधन किती लिटर विक्री झाले याची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही.

पुढील 21 वर्षांत अशी होईल वसुली
(दर वाढल्यास रक्कम वाढू शकते)
डिझेल : 126 कोटी 76 लाख 80 हजार
पेट्रोल : 64 कोटी 43 लाख 20 हजार
टोल : 150 कोटी
पाच टक्के इंधन विक्री आणि टोलची मक्ता वाढ : 49 कोटी
एकूण 390 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा अधिक