आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Of Demonstrations Against Mahayuti; Given To Increase The Signal Intensity

टोलविरोधात महायुतीची निदर्शने; तीव्रता वाढवण्याचा दिला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या महायुतीतर्फे टोल वसुलीविरुद्ध सोमवारी आंदोलन करण्यात आले. अक्कलकोट नाका परिसरात निदर्शने केली. दीड तास चाललेल्या आंदोलनात भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील व विजयकुमार देशमुख यांच्यासह शिवसेना, रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या बहुतांश नगरसेवकांची मात्र अनुपस्थिती होती.
शहरातील खराब रस्त्यासाठी टोल कशाला असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. टोल आणि इंधन अधिभार तत्काळ बंद करावे अन्यथा यापुढे शहरातील टोल वसुली करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळामार्फत (एमएसआरडीसी) शहरात विकसित केलेल्या रस्त्यांसाठी 86 कोटी खर्च झाले. त्याची भरपाई टोलमधून करण्यात येत असून अक्कलकोट नाका, देगाव, बार्शी नाका, होटगी रस्त्यावरील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामासमोर नाके उभे केले आहेत. तेथे 25 ते 60 रुपये वेगवेगळ्या वाहनांसाठी वसूल केले जात आहे. बांधलेले रस्ते खराब झाले आहेत. त्याची दुरुस्ती होत नाही. खराब रस्त्यांसाठी सोलापूरकरांना भुर्दंड बसत आहे, असे सांगत आंदोलन पुकारले आहे.
‘टोलमुक्त सोलापूर झालाच पाहिजे’,
‘खराब रस्त्यासाठी टोलवसुली करणा-या आघाडी सरकारचा धिक्कार असो’, ‘आघाडी सरकारचा धिक्कार असो’ आदी घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. हातात झेंडे, गळ्यात पक्षाचे उपरणे घालून सुमारे 200 कार्यकर्ते सहभागी झाले होते. तत्काळ टोल बंद करावे. अन्यथा शिवसेना तोडफोड करेल, अशी धमकी शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली. शिवसेनेचे विद्यार्थी सेनेचे प्रमुख महेश धाराशिवकर, कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी, संतोष पाटील, विजय पुकाळे, नगरसेवक शिवानंद पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी, नागेश वल्याळ, संजय कोळी, अमर पुदाले, राजू पाटील, ज्ञानेश्वर कारभारी, डॉ. शिवराज सरतापे, शिवानंद नागणसुरे, अनिल कनकट्टी आदी उपस्थित होते.