आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण सोलापूर हवाई कक्षेत; प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - होटगी रस्त्यावर असलेल्या विमानतळापासून 15 किलोमीटरपर्यंतच्या अंतरात बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची मंजुरी घेणे गरजेचे आहे. यापुढे महापालिकेने इमारत बांधणीसाठी परवानगी देताना भारतीय विमानतळ प्राधिकरणाची मंजुरी आहे की नाही हे पाहावे. मंजुरी नसल्यास कोणत्याच इमारतींना परवानगी देऊ नये, अशा आशयाचे पत्रच विमानतळ प्रशासनाने महापालिकेने धाडले आहे. त्यानुसार आता संपूर्ण सोलापूर शहरच विमानतळाच्या क्षेत्रात येत आहे.


विमानतळाच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. त्या बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली असेल आणि विमानतळ प्रशासनाची परवानगी नसेल तर ते अवैध समजले जाते. याबाबतचे पत्र विमानतळ प्रशासनाने सोलापूर महापालिकेच्या नगर अभियंताच्या नावे 10 ऑगस्ट 2011 रोजी दिले होते. 2011 नंतर सोलापूर शहरात शेकडो इमारती बांधल्या गेल्या आहेत. यापैकी बालाजी अमाइन्सने भारतीय विमानतळ प्र्राधिकरणाकडे मंजुरी मागितली आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही इमारतीसाठी विमानतळ प्राधिकरणाकडे परवानगी मागितली गेली नाही, असे विमानतळ प्रशासनाचे म्हणणे आहे.


महापालिकेचे नगर अभियंता सुभाष सावस्कर म्हणाले की, ‘महापालिकेकडे विमानतळ प्रशासनाने इमारतींना मंजुरी दिल्याचे पत्र आहे.’ त्यामुळे नेमके कोण खरे बालतो आणि कोण खोटे हे ठरविणे अवघड बनले आहे.


फ्लाइंग झोनचा गाभा अडचणीत
कोणत्याही विमानतळाला दोन फ्लाइंग झोन असतात. दोन्ही बाजूने उतरणे व हवेत झेप घेणे हा त्यामागचा उद्देश. सोलापूर विमानतळाला मात्र एकच फ्लाइंग झोन आहे. तो आस-याच्या दिशेचा. कारण दुस-या बाजूला साखर कारखान्याची चिमणी आहे. त्यामुळे तेथून कोणतीच हवाई वाहतूक होत नाही. आस-याच्या दिशेने असलेला फ्लाइंगचा मुख्य गाभा हा रन वे पासून 5 किमी अंतरापर्यंत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या गेल्या आहेत. तसेच 15 ते 20 मोबाइल टॉवर आहेत. त्यामुळे विमानाच्या अथवा हेलिकॉफ्टर्सच्या वैमानिकांना धावपट्टीवर उतरताना अथवा झेपावताना अडचणीचे ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात येत आहे. याकडे विमानतळ प्रशासनाने वेळी लक्ष दिले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.


इमारत बांधण्यासाठी नियम काय?
फ्लाइंग झोनच्या मुख्य भागात इमारतीची उंची खूप महत्त्वाची ठरते. येथे इमारत बांधावयाची असल्यास रन वे पासून 360 मीटर अंतरापर्यंत एका सिंगल खोलीच्या उंचीपर्यंत बांधता येईल. 381 मीटरपर्यंत गेल्यास एक मीटर उंचीला परवानगी आहे. 591 मीटरच्या पुढे गेल्यास 10 मीटर उंचीचे घर बांधता येऊ शकते. पण त्यापूर्वी विमानतळ प्रशासनाकडून परवानगी आवश्यक आहे. होटगी रस्त्यावरील विमानतळाच्या परिसरात बांधण्यात आलेली घरे या नियमाप्रमाणे बांधण्यात आलेली नाहीत, असे विमानतळ प्रशासनाचे म्हणणे आहे. दुस-या बाजूला सोलापूर महापालिकेतील जबाबदार अधिका-यांचे म्हणणे मात्र नेमके याउलट आहे. महापालिकेकडे विमानतळ प्रशासनाने बांधकामासाठी मंजुरी दिल्याची कागदपत्रे असल्याचे असल्याचे मनपा अधिका-यांचे म्हणणे आहे.


माळढोक प्रकरण जसे शहर विकासाच्या आड आले, तसे होऊ नये
नेमके नियम काय आहेत ते पाहायला हवे. या नियमामुळे सोलापूर शहराचा विकासही खुंटायला नको आहे आणि विमानतळाच्या प्रक्रियेस ही कोणती बाधा येता कामा नये. योग्य विचार करून निर्णय झाला पाहिजे.’’
अजय सावरीकर, आयुक्त मनपा.


भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मंजुरीनंतरच काही इमारतींना मंजुरी देण्यात आली आहे. नेमका आकडा आता सांगता येणार नाही, पण याचा विचार झाल्यास संपूर्ण सोलापूर शहर हे विमानतळाच्या क्षेत्रात येते. माळढोक प्रकरण जसे सोलापूर शहराच्या विकासाच्या आड आले, तसाच प्रकार सोलापूर विमानतळाच्या बाबतीत होईल. सोलापूर विमानतळाची इमारत बांधताना तरी त्यांनी परवानगी घेतली आहे का?’’
सुभाष सावस्कर, नगर अभियंता, मनपा, सोलापूर


भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने अद्याप सोलापुरातील एकाही इमारतीला मंजुरी दिलेली नाही. केवळ होटगी रोडवरील बालाजी अमाइन्सने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. तीदेखील अद्याप प्रकियेत आहे.’’
संतोष कौलगी, सोलापूर विमानतळ व्यवस्थापक, भारतीय विमानतळ प्राधिकरण


होटगी रोडवर इमारत बांधताना आम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी मागितली होती आणि ती आम्हाला मिळाली आहे. कुणाला आक्षेप असल्यास आम्ही कागदपत्रे दाखवू.’’
डी. राम. रेड्डी, बालाजी अमाईन्सचे संचालक


यापूर्वी महाराष्‍ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने महापालिकेला भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या 15 कि.मी.पर्यंत इमारत बांधावयाची असल्यास परवानगी घ्यावी असे पत्र दिले होते. अद्याप कोणत्याही इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी मागितलेली नाही.’’
सज्जन निचळ, विमानतळ व्यवस्थापक, सोलापूर (बोरामणी)