आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्‍ये प्रणिती शिंदे, आडम यांच्यात चुरशीची लढाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, माकपाचे नरसय्या आडम, शिवसेनेचे महेश कोठे या तगड्या उमेदवारांमुळे लढत अटीतटीची बनली आहे. नेहमी काँग्रेस आणि माकपच्या बाजूने असणारी मुस्लिम समाजाची मते एमआयएमच्या उमेदवारामुळे किती प्रमाणात विभागली जातील यावरून निकालाची दिशा ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपच्या मोहिनी पत्की, राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे, बसपाचे शैलेंद्र वाघमारे, बहुजन मुक्ती पार्टीचे समिउल्ला शेख यांच्यासह १७ अपक्षही रिंगणात आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत प्रणिती यांची नैया सहज पैलतीरी पोहोचली होती.

हाताविरुद्ध धनुष्यबाण अन् हातोडा
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक अल्पसंख्याकबहुल मतदारसंघ अशी शहर मध्यची ओळख आहे. काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवाराला संधी न दिल्याची बोच ‘एमआयएम’ला िमळत असलेल्या प्रतिसादावरून स्पष्ट जाणवते. पुनर्रचना होण्यापूर्वी शिवेसेनेने एकदा आणि माकपाने दोनदा या मतदारसंघातून विजयश्री खेचली होती. महेश कोठे यांनी खेचलेला बाण, माकपच्या हातोड्याचा रोख काँग्रेसविरुद्धच आहे. एमआयएमच्या पतंगाला किती मते मिळतात यावरच निकालाची दिशा ठरणार आहे.

प्रतिष्ठा आणि अस्तित्व पणाला
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाने पक्षात धुसफूस सुरू झाली. कोठे यांच्या रूपाने पक्षाला खिंडार पडले. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना मतदारसंघ राखणे प्रतिष्ठेचे झाले आहे. शिवसेनाचा झेंडा हाती घेऊन उभे असलेले महेश कोठे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची बनली आहे. वरकरणी काँग्रेस-माकप अशी पारंपरिक लढत असली, तरी महेश कोठे यांच्यामुळे निवडणुकीची समीकरणेच बदलून गेली आहेत. त्यांनी काँग्रेसचा परंपरागत मतदार राहिलेल्या वस्त्यांमधून कडवे आव्हान उभे केले आहे.

सामना बहुरंगीच होणार
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या महेश कोठे यांनी शिवसेनेकडून, तर माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी ‘एमआयएम’कडून निवडणूक मैदानात पाय रोवले आहेत. काँग्रेसच्या निवडणूक तंत्राची जबाबदारी यापूर्वी कोठे यांच्याकडेच असे, आता तेच प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्पातही बहुरंगीच सामना दिसतो आहे. बाहेरील लोकांसाठी पोलिस मुख्यालयातील मशीद बंद करण्यात आल्याचा विषय माकप व एमआयएमने प्रतिष्ठेचा केला आहे. आडम यांच्याकडून हा विषय उचलण्यात येत असल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे.

प्रणिती शिंदे : कार्यकुशलतेची चुणूक
काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची कन्या ही ओळख मागे टाकून आमदार प्रणिती सुशिलकुमार शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांत स्वत:च्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवली. सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे या दुस-यांदा जनाधार आजमावत आहेत. आमदार प्रणिती शिंदे या १५०० कोटींची विकास कामे केल्याचे सांगून मतदारांना प्रभावित करताहेत.

नरसय्या आडम : मजबूत संघटन फळी
तगडा लोकसंग्रह असलेला नेता अशी नरसय्या आडम यांची ओळख आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लढवय्ये शिलेदार नरसय्या आडम यांनी मजबूत संघटन फळीच्या आधारे काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. आडम हे कष्टकरी कुटुंबांच्या डोईवर छत देण्याचा विधायक संघर्ष उभारून श्रमिकांची प्रतिष्ठा जपण्याचा मूलभूत मुद्दा घेऊन रिंगणात आहेत.
काँग्रेस, माकपला धडकी : शिवसेना आणि एमआयएमच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा काँग्रेस आणि माकपला धडकी बसवणारा आहे.

ध्रुवीकरणाचा प्रयत्न : हैदराबादेतील ओवेसी बंधूंच्या सभांना प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांनी कर्नाटकातील श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांची सभा घेतली.