आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॉवेल कारखान्याला आग, दीड कोटीचे झाले नुकसान; शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमधील अजिंठा टेक्स्टाईल कॉर्पोरेशन मंगळवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत तब्बल दीड कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

औद्योगिक वसाहतीत सुनील जैन यांच्या मालकीचे अजिंठा टेक्स्टाईल आहे. याठिकाणी निर्यातक्षम टॉवेल व सुताचे उत्पादन होते. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता कारखाना बंद झाला. रात्री साडेनऊच्या दरम्यान कारखान्यातून अचानक धूर येत असल्याचे त्या शेजारील बिंगी टेक्स्टाईलमधील कर्मचार्‍यांना दिसले. त्यांनी सुरक्षारक्षकास त्याबाबतची कल्पना दिली. कारखाना उघडून पाहिले असता टॉवेलचे गठ्ठे जळत असल्याचे दिसले. त्वरित अग्निशामक दलास बोलावण्यात आले.

सुरुवातीला फक्त एक गाडी पाणी घेऊन अग्निशामक दलाचे जवान आले. पण, वार्‍यामुळे आग भडकली. कारखान्यातील सर्व 16 लूमसह टॉवेल व सुताचे गठ्ठे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. धुराचे लोट दिसताच, औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली. अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सर्व गाड्या घटनास्थळी मागवल्या. तसेच, खासगी टँकरमधून पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण, नियोजनाच्या अभावामुळे सुरुवातीला फारसे यश आले नाही. आगीच्या ज्वाळा शेजारील बिंगी कारखान्याला लागण्याची शक्यता दिसताच, एमआयडीसीच्या अग्निसुरक्षा दलाच्या जवानांंचे पथक बोलावण्यात आले. आगीवर सहा गाड्यांद्वारे एकदम पाण्याचा मारा सुरू झाल्याने आग थोडीफार नियंत्रणात आली. दरम्यान, कारखान्याच्या कार्यालयातील कागदपत्रे, संगणक सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले. तसेच, वाळत घातलेले सुताचे काही गठ्ठेही काढण्यात आले. रात्री साडेबारा वाजेपर्यंत 17 गाड्या पाणी मारून आग आटोक्यात आणण्याची धडपड सुरू होती.
बघ्यांच्या गर्दीमुळे मदत कार्यात अडथळा
कारखान्याला लागलेली आग विझवण्यासाठी काहीजणांची धडपड सुरु होती. तर, त्या परिसरातील काही कामगार मोबाईलमध्ये चित्रीकरण व छायाचित्र करण्यासाठी धडपडत होते. रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या दुचाकी व बघ्यांच्या गदीमुळे मदत कार्यात अडथळे आले. पोलिसांनी गर्दी पांगवली.