आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्‍ये जडवाहतुकीने घेतला आणखी एक बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-मार्केट यार्डसमोरील रस्त्यावर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. एकजण गंभीर जखमी झाला. दोघे दुचाकीवर होते. त्यांना ट्रकची धडक बसली. साईनाथ विठोबा वालीकर (वय 40, रा. बोरगाव, अक्कलकोट) मृताचे नाव आहे. सुरेश मलकप्पा पांढरे (वय 29, रा. पितापूर, अक्कलकोट) जखमी झाले. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

ट्रकचालक लादू हिरालाल तेली (वय 28, रा. बिलवाडा, राजस्थान) यास जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली. वालीकर व पांढरे दुचाकीने (एमएच 13, बीजे 4164) घरी जात होते. दुपारी जडवाहतूक सुरू झाली होती. धुळ्याला निघालेला कंटेनर (आरजे 27, जी ए 3079)चा धक्का दुचाकीस धक्का लागला. त्यात वालीकर कंटेनरच्या मागील चाकाखाली आले. पांढरे बाजूला पडल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वालीकर बांधकाम कंत्राटदार असून पांढरे मजूर म्हणून काम करतात. सोलापुरातील एका कामाचे पैसे घेतल्यानंतर ते घरी जात होते.

सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर येथे एका गाळ्यात माझा व्यवसाय आहे. आम्ही वाहतुकीचा खोळंबा दररोज पाहतो. नेहमी अपघात घडत आहेत. धुळीचाही त्रास होतो. जडवाहतूक दिवसभर नसावीच.’’ अंबादास दुर्गम, व्यापारी

दुपारी मार्केट यार्डपासून चाचा हॉटेलपर्यंत जाण्यास तब्बल एक तास लागतो. त्यामुळे आम्ही मार्केट यार्डच्या मागून जातो. परंतु त्या मार्गावरूनही जडवाहतूक सुरू आहे. तो रस्ताही खराब झाला.’’ रफिक शेख, रिक्षाचालक

जडवाहतूक आणि इतर वाहतूक सुद्धा जास्त आहे. त्यामुळे धुळीचा खूप त्रास होतो. धूळ जास्त असल्याने वाहन चालविणे अवघड होते. त्यामुळे जडवाहतूक दिवसा नसावीच.’’ रमेश वल्लाकाटी, नागरिक

किती वाट पाहणार?
अशोक चौक ते जुना बोरामणी नाका दरम्यान गेल्या वर्षी अनेकांचा बळी गेला. यात काही विद्यार्थी होते. जडवाहतूक बंद करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले. बंदीची मागणी लावून धरली. जडवाहतूक बंदही झाली. त्यांना संध्याकाळ ते सकाळपर्यंची वेळ देण्यात आली. नंतर काही राजकीय नेत्यांमुळे दुपारी 1.30 ते 3.30 अशी दोन तास जडवाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे अपघात पुन्हा घडला.

वाहतुकीचा खोळंबा नेहमीचाच
जडवाहतुकीची वेळ दुपारी 1.30 ते 3.30 आहे. त्यामुळे सायंकाळी पाचपर्यंत जडवाहतूक सुरूच असते. ती सुरू झाली की मार्केट यार्डसमोरून जाणे दुचाकीस्वारांना अशक्यच बनते. येथे तीन-चार वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस असतात. मात्र, वाहतूक सुरळीत करणे अवघड बनते.

.. तर अपघात टळला असता
सिद्धेश्वर शॉपिंग सेंटरसमोर एक ट्रक गेल्या काही महिन्यापासून उभा आहे. त्याच्या शेजारून ट्रक जात होता. या दोहोतून मार्ग काढण्याचा प्रयत्न दुचाकीस्वाराने केला. चालत्या ट्रकच्या धक्क्याने तो मागील चाकात आला. तो बंद ट्रक उभा नसता तर कदाचित अपघात टळला असता, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केली.