आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमीनिमित्त रथोत्सव घुमला जय जय चिम्मटेश्वरचा घोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- तेलुगु नाभिक समाज कुलदैवत चिम्मटेश्वरांचा शुक्रवारी नागपंचमीनिमित्त रथोत्सव झाला. त्यात सहभागी तरुणाई ढोल- ताशांच्या निनादात थिरकली. जयशंकर मंडळाच्या युवकांचे शक्तिप्रयोग अवाक् करणारे होते. ‘जय चिम्मटेश्वर. जय जय चिम्मटेश्वर’चा जयघोष करीत समाजबांधव त्यात सहभागी झाले होते.

पंचमुखी शेषनागाने वेढलेल्या महादेव पिंडीची मूर्ती ट्रॅक्टरवर ठेवून ही मिरवणूक निघाली. कन्ना चौकात खासदार अँड. शरद बनसोडे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम, महापालिकेतील सभागृह नेते महेश कोठे आदींनी पूजा केली. त्यानंतर मिरवणुकीस सुरवात झाली. ढोल-ताशा, बँण्ड पथक आणि शक्तिप्रयोग लक्षवेधी ठरले. कन्ना चौक, उद्योग बँक, मार्कंडेय चौक, जोडबसवण्णा चौक, पद्मशाली चौक, दत्तनगर, अशोक चौक मार्गे साईबाबा चौक येथील मंदिरात त्याची सांगता झाली.

संत सेना नाभिक दुकानदार संघाचे अध्यक्ष सुरेश हडपद, भारत शिंदे, भारत क्षीरसागर, सचिव अभयकुमार कांती, कार्याध्यक्ष आनंद सिंगराल, उत्सव समिती अध्यक्ष र्शीनिवास रासकोंडा, आदी मिरवणुकीत सहभागी होते.
अशी आहे आख्यायिका
पुराणातील अख्यायिकेत नाभिकाचा जन्म सांगितला आहे. सृष्टीच्या निर्मितीत भगवान शंकराला नाभिकाची निर्मिती हवी होती. तेव्हा शंकराच्या गळ्यातील शेषाला स्वत:च्या नाभी कमळातून जन्म घेण्यास सांगितले. तेव्हा शेषाने भगवानला विचारले, ‘जन्मानंतर मला काय प्राप्ती होईल?’ तेव्हा शंकर उत्तरले, ‘‘श्रावण महिन्यातील पंचमीस तुझे पूजन होईल. स्त्रियांचा तू भाऊ होशील.’’ शेषाने शंकराच्या नाभीतून जन्म घेतला. म्हणून त्याच्या वंशजांना नाभिक म्हटले आहे. नागपंचमीला त्यांचा उत्सव असतो.