आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर परिसरात सोमवारी भाविकांची मोठी गर्दी; पहिल्या सोमवारी ट्रॅफिक जॅम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर परिसरात सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होती. दुचाकी, चारचाकी पार्किंग सिध्देश्वर प्रशालेसमोर आणि होम मैदानाच्या बाजूला दिल्यामुळे वाहनांची गर्दी, वाहतुकीची कोंडी ही समस्या भाविकांना अनुभवास आली. र्शावणातील पहिल्या सोमवारी गर्दी असते, याची कल्पना असतानाही पोलिसांचे नियोजन दिसून आले नाही. फडकुले सभागृह ते रिपन हॉल तसेच पुढे रेमंड शोरूम येथे बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. रेमंड शोरूमच्या बाजूचा मार्ग ते भगिनी समाजपर्यंतचा एका बाजूचा रस्ता बंद होता. याशिवाय होम मैदानावर चिखल झाल्यामुळे सिध्देश्वर शाळा ते डफरीन चौकाच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर चारचाकी वाहने, जीप, दुचाकी रस्त्याच्या कडेलाच होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा संमती कट्याजवळ पार्किंगला मज्जाव आहे.
काही वाहने आत आली
सिध्देश्वर शाळेपासून खाली वाहने नेण्यासाठी बंदी असताना पोलिस, राजकीय नेते, पुढारी यांची वाहने संमती कट्यापर्यंत आली. एकाला एक नियम दुसर्‍यांना एक नियम यामुळे पोलिसांचा दुजाभाव दिसला. पण, सायंकाळी मात्र एकही वाहन खाली आले नाही. जास्त पोलिसांचा ताफा मंदिर परिसरात लावून आणखी नियोजन करता आले असते. पण, पुणे, विजापूर मार्गावर सहा-सहा पोलिस थांबून परजिल्ह्यातील वाहनांवर कारवाई करण्यात गुंतले होते.
होम मैदानावर पार्किंग
वाहनांची गर्दी, वाहतुकीची कोंडी ही समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे पाहण्यासाठी पोलिस उपायुक्त अश्विनी सानप यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त मोरेश्वर आत्राम, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, अरुण वायकर उपस्थित होते. मंदिर समितीच्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली. पार्किंगची सोय होम मैदानावरच राहील. पाऊस आल्यास रेमंड शोरूम ते मार्केट पोलिस चौकीच्या बाजूचा एका भाग (दुभाजक) पार्किंगसाठी वापरण्यात येणार असल्याचे र्शी. आत्राम म्हणाले. आज पंधरा ते वीस वाहतूक पोलिस नेमले होते.