आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक व्यवस्थेला क्रेनच्या कारवाईने शिस्त लागेल का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली की वाईट असे कुणी विचारले तर पटकन उत्तर येईल फारच वाईट. महापालिका वाहतूक सुधारण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती सुरू करत नाही. सिग्नल, झेब्रा क्रॉस पट्टे, सम-विषम तारखेचे, एकेरी मार्गाचे फलक लावणे आदींबाबत उदासीनता दिसून येते. सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे महापालिकेकडे ‘ट्रॅफिक इंजिनिअर’ हे पदच नाही !
या बाबींचा विचार व्हावा
वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडे नियोजन नाही. चौकात नाक्यावर पोलिस नेमले म्हणजे काही तरी काम केल्याचे धन्यता मानली जाते. परजिल्ह्यातील वाहने अडविणे, नो-पार्किंगला असलेल्या दुचाकी क्रेनच्या साह्याने उचलणे, ही कामे सध्या सुरू आहेत. या कारवाईतही दुजाभाव आहे. चारचाकी वाहनांवर कारवाई क्वचित होते. दुचाकी उचलून नेणे बेकायदा आहे. पार्किंगसाठी पांढरे पट्टे पाहिजेत. त्याच्याबाहेर वाहन असल्यास कारवाई होऊ शकते. पांढरे पट्टे नसल्यास कारवाई होत नाही. त्याच्या उलट पोलिस आणि क्रेनवरील कर्मचाऱ्यांच्या मनात जे येईल तीच कारवाई बरोबर समजली जाते. याला वाहतूक नियोजन म्हणायचे का? यामुळे शिस्त येईल का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
वाहतूक शाखेचे दोन विभाग आहेत. दक्षिण आणि उत्तर. त्यांच्याकडील दोन क्रेनव्दारे दत्त चौक, सातरस्ता, गरूड बंगला परिसर, संगमेश्वर कॉलेज, रेल्वे स्टेशन, डफरीन (मंजू हॉटेल परिसर), जुना एम्प्लॉयमेंट चौक, महावीर चौक परिसर या ठिकाणी दुचाकीवर कारवाई होते. वाहन एकदा गाडीवर आले की दोनशे रुपये दंड आकारतात. ज्या ठिकाणाहून गाडी उचलली त्या ठिकाणाहून वाहतूक शाखेत येण्यासाठी रिक्षाने आल्यास अडीचशे ते तीनशे रुपये खर्च होतात. यामुळे शिस्त लागणार आहे का. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, सातरस्ता, नवीपेठ, मधला मारुती, चाटी गल्ली, कोंतम चौक, होटगी रोड, विजापूर रोड, जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरातील व्हीआयपी रस्ता या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी असते. या ठिकाणी मात्र कारवाई होत नाही. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करा याबद्दल आमचे दुमत नाही. कारवाई करण्याअगोदर वाहने लावण्यासाठी पार्किंगची सोय आहे का? मुख्य रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत. त्याच्या आतच वाहने लावण्याची सूचना पाहिजे. सम-विषम तारखेस वाहने लावण्याचा नियम पाहिजे. बाजारपेठांमध्ये एक दिवस नो व्हेईकल डे हा नियम पाहिजे. तरच यावर अंकुश येईल. कुठल्याही रस्त्यावार दिसली की गाडी उचल आणि दंड घे. हे योग्य नाही. पोलिसांकडून कारवाई सक्षमपणे व्हावी. गाडी पकडल्यानंतर जो हस्तक्षेप होतो तो थांबविण्यात यावा. या कारवाईमुळे आतापर्यंत शिस्त लागली का?
शहरातील मुख्य गर्दीचे ठिकाण, बाजारपेठांमधील वाहतूक व्यवस्था करण्यासाठी पार्किंगची पाहणी व्हावी. महापालिकेकडून पांढरे पट्टे मारून घ्यावेत. एकाच ठिकाणी पार्किंग करता येईल का?. मुख्य रस्त्याावरही पे अँड पार्क करता येईल का? याचा विचार व्हावा. नियम तोडत असल्यास दंडात्मक कारवाई करा. दुचाकीसोबत चारचाकी, मोठी अवजड वाहने, कार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. क्रेनची कारवाई म्हणजे नागरिकांना मनस्ताप आणणारी आहे. जनतेच्या भावनांचा विचार व्हावा. फक्त क्रेनमालक पोलिस यांच्यासाठी ही मोहीम नको.