आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहितेंच्या भाऊबंदकीचे पालखी सोहळ्यातूनही ‘दर्शन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील अकलूजच्या रिंगणात दरवर्षी मोहिते पाटील यांच्या अश्वांना मानाचे स्थान दिले जाते. मात्र, लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील व प्रतापसिंह मोहिते पाटील या दोन भावांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. मोहितेंमधील या भाऊबंदकीची प्रचिती शुक्रवारच्या रिंगण सोहळ्यातही आली.

तुकोबांच्या रिंगण सोहळ्यात खासदार विजयसिंह यांचे दोन बंधू जयसिंह व प्रतापसिंह मोहिते यांचे अश्व धावतात, परंतु या वेळी प्रतापसिंह यांचा अश्व रिंगणात न धावताच निघून गेला. शेवटी जयसिंह यांच्या अश्वाबरोबर पालखी सोहळ्यातील मानाच्या बाभूळगावकरांचा अश्व पळवण्यात आला आणि रिंगण सोहळा पार पडला. या विषयी रिंगण सोहळ्यात मोठी कुजबुज सुरू होती. या घटनेसंदर्भात जयसिंह व प्रतापसिंह यांनी माध्यमांसमोर आपापल्या बाजू मांडल्या.

सोहळ्यात राजकारण
विजयसिंह मोहिते व जयसिंहांनी आकसापोटी माझा अश्व बाहेर काढला. धार्मिक ठिकाणीही त्यांनी राजकारण आणले. मी गेल्या 30 वर्षांपासून पालखी सोहळ्यात अश्व पाठवतो, परंतु यापुढे पाठवणार नाही, असे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते
यांनी सांगितले.

स्वारानेच अश्वास बाहेर नेले
आम्ही अश्व बाहेर काढला नाही. उलट पूजेसाठी बोलावले असता स्वाराने अश्व बाहेर नेला. त्याने कोणाचेही ऐकले नाही. अशा पवित्र ठिकाणी दुजाभाव करण्याचे काहीच कारण नाही, असे स्पष्टीकरण सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते यांनी दिले.

दोन्ही बंधूंचा गैरसमज दूर करू
कोणीच कोणाचा अश्व बाहेर काढला नाही. प्रतापसिंह व जयसिंह यांचा गैरसमज दूर करू. इंदापूर येथील रिंगणात हे दोन्ही अश्व धावले होते, असा खुलासा पालखी सोहळ्याचे प्रमुख अशोक महाराज मोरे यांनी केला.
या पालखी सोहळ्यात दोन्ही मोहिते बंधूंच्या अश्वांचे मोठे योगदान आहे. ते यापुढेही असेच चालू राहील. यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू.

(फोटो - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिंगण शुक्रवारी अकलूज येथे पार पडले. पावसाने ओढ दिल्याने वारकर्‍यांची गर्दी घटली असली, तरी रिंगणावेळी भक्तिभाव ओसंडून वाहत होता.)