आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळे सोलापूर, विडी घरकुल आराखडा रद्दची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर महापालिका हद्दीतील जुळे सोलापूर आणि विडी घरकुल क्षेत्रातील विकास आराखडा हा पारदर्शी झाला नाही. सत्ताधाऱ्यांनी जनहितपेक्षा स्वहित साधून आराखडा मंजूर केला जाऊ नये, असा आक्षेप पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोंदवला आहे. मुंबई- पुणेप्रमाणेच जुळे सोलापूर विडी घरकुल क्षेत्राचा विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतो.

आराखडा मंजुरीची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने परिसरातील नागरी विकासाला फटकाही बसेल. मनपा नगररचना विभागाने तयार केलेला प्रस्ताव सभागृहात खुला करण्यास सहा महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर मनपाने सूचना, हरकती मागवून कमिटीच्या शिफारशीनुसार दुरुस्तीसह प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आला.
सभागृहात यावर अधिक खुलेपणाने चर्चा झाली नाही. सभागृहाबाहेर सत्ताधारी नगरसेवकांतच याबद्दल धुसफूस सुरू होती. परस्पर काही आरक्षणे बदलल्याने सत्ताधारी पक्षात झालेला वाद काँग्रेस शहराध्यक्षांपर्यंत पोहोचला. यानंतर सभागृहात दुरुस्ती प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.
भाजप-शिवसेनेच्या आक्षेपाचा विचार केला गेला नाही. आराखडा मंजुरीसाठी मार्च रोजी शासनाकडे पाठवण्यात आला. जुळे सोलापूर भाग या भागाचे एकूण क्षेत्र २९३.०० हेक्टर तर जुळे सोलापूर भाग या भागाचे एकूण क्षेत्र १७३.५२ इतके आहे. भाग एकच्या मंजूर विकास योजनेमध्ये एकूण ६९ आरक्षणे होती. त्यांचे क्षेत्र ९१.६३ होते. भाग दोनचे १७३.५२ हेक्टर क्षेत्र आहे.

कागदपत्रांची पूर्तता करत आहोत, काहीवर महापौरांची सही राहिली

नगर रचनाकार विशेष घटक यांनी आराखडा तयार करून सादर केला होता. या विषयासंदर्भात ज्या कागदपत्रांची मागणी शासनाने केली आहे, त्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून कागदपत्रांची पूर्तता करेन. काही कागदपत्रांवर महापौरांची स्वाक्षरी घ्यायची आहे, ती घेऊन पाठवून देऊ.” एन.एम. क्षीरसागर, प्रभारी, साहाय्यक संचालक, नगर रचना, महापालिका

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा प्रशासनावर विश्वास नाही

जुळे सोलापूर भाग च्या विकास आराखड्यासंदर्भात प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावालाच आम्ही मंजुरी दिली. सदस्यांनी सुचवलेल्या सूचना रद्द केल्यात. महापालिकेच्या सभेत तोच मंजूर झालेला आहे. तरीही अशी शंका घेण्यात येत आहे. प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर पालकमंत्र्यांचा विश्वास नाही. यातून त्यांचा वेगळा विचार दिसून येतो.” प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष, कॉँग्रेस

महापालिकेकडून होत नाही कागदपत्रांची पूर्तता

पुणे येथील नगर रचना कार्यालयात प्रस्ताव छाननीसाठी आहे. छाननीत काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना केलेली आहे. सोलापूर महापालिकेने अद्याप त्याची पूर्तता केली नाही. ही पूर्तता केल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत विषय मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जातो.

प्रशासनाचा उत्तम प्रस्ताव, सभेत अनेक अयोग्य बदल

महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव उत्तम होता. सर्वसाधारण सभेत अनेक आरक्षणे बदलण्यात आली. जनहितापेक्षा स्वहित साधले. भाजपा नगरसेवकांच्या शिष्यमंडळासह मी आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून आक्षेप म्हणून निवेदन दिले आहे. वस्तुस्थिती समजून घेतल्याशिवाय मंजुरी देऊ नये, अशी विनंती केली आहे.” विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

पुणे कार्यालयाने काही कागदपत्रे मागवली आहेत

विकास आराखड्याचा प्रस्ताव शासन मंजुरीसाठी मार्च रोजी पाठवला आहे. पुणे नगर रचना कार्यालयाने जी कागदपत्रे मागितली आहेत ती अद्याप महापालिकेकडून पुरवली नाहीत. त्यानंतर प्रस्तावाची छाननी होऊन मंत्रालयाकडे जाईल. मंजुरीचा कालावधी सहा महिन्यांचा आहे.” द.नि. पवार, प्रभारी, साहाय्यक संचालक, नगर रचना, सोलापूर