आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळविट शिकार प्रकरणी माजी आमदार पुत्र कोठडीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ - वटवटे-जामगाव (ता. मोहोळ) च्या माळरानावर काळविटांची शिकार करणार्‍या कोल्हापूरच्या तिघांना कामती पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री 12 वा. शिताफीने पकडले. अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पकडलेल्यांमध्ये एक माजी आमदार लालसाहेब यादव यांचा पूत्र आहे. आरोपींनी बंदुकीच्या साहाय्याने काळविटांची शिकार केली असून ते मृत काळविटांना जीपमधून घेऊन निघाले होते. पोलिसांनी रायफल, काडतुसे, जीप जप्त केली आहे. तिघांना मोहोळ न्यायालयाने 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

विक्रम राजाराम पाटील (वय 48, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), माधव लालसाहेब यादव (वय 42, रा. मंगळवारपेठ, कोल्हापूर), रणजित विजयसिंग यादव (वय 32, रा. सुभाष रोड, कोल्हापूर) या तिघांना काळवीट शिकार प्रकरणात अटक केली आहे. सर्जेराव पाटील (रा. सोडली, खालसा, कोल्हापूर) व कामती परिसरात राहणारा मंजूर नावाचा तरुण असे दोघेजण पळून गेले आहेत. जीनीओ नावाची जीप (एमएच 09 सीएम 1321), बावीस बोअर राऊंड, रायफलचे 47 काडतुसे व आठ रिकामे, दोन चाकू, बॅटरी जप्त करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील पाच जण जामगाव शिवारात शिकारीसाठी आले होते. रायफलमधून गोळी झाडून त्यांनी दोन काळविटांची शिकार केली. मृत काळवीट जीपमधून नेताना पोलिसांना जीपचा संशय आला. गस्त घालणारे पथक साहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक सायकर, हवालदार एस. एम. पाटील, सचिन वसमळे, भरत बागुल, प्रशांत बंगाळे, अनंत चमके, सलगर, बोधवर यांनी माळरानावर गाडीचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान त्यांना पकडण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक मनीषा दुबुले, जिल्हा वनाधिकारी किशोर ठाकरे घटनास्थळी पोहोचले. संशयितांवर वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 कलम (9, 51, 498 बी) व आर्म अँक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार सचिन वसमळे यांनी फिर्याद दिली आहे. अटकेत असलेल्या तिघांना मोहोळचे न्यायाधीश एन. एन. धेंड यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. माढा, करमाळा, मोहोळ या तीन तालुक्यातील वनसंरक्षणासाठी केवळ पाच अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती मिळाली.

खड्डय़ात जीप अडकल्याने आरोपी हाताला
पोलिसांची गाडी पाहून जीपचालक भरधाव गाडी घेऊन निघाला. खड्डय़ात त्यांची जीप फसली अन त्याच गडबडीत दोघे पळून गेले. तिघे ताब्यात सापडले.

चौकशीसाठी ताब्यात घेणार
अटक केलेल्या तिघांना चौकशीसाठी वनविभाग ताब्यात घेणार आहे. तपासात आणखी काही बाबी समोर येतील. या परिसरात गस्त घालण्यात येईल. -किशोर ठाकरे, जिल्हा वनाधिकारी