आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेज खड्डय़ात दोन चिमुरड्यांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कुंभारीजवळील विडी घरकुल परिसरात ड्रेनेजसाठी खोदलेल्या पंधरा फूट खोल पाण्याच्या खड्डय़ात बुडून सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला. दोघेही पहिलीच्या वर्गातील खास मित्र होते. खेळता-खेळता पाय घसरून पडल्यामुळे ही दुर्घटना मंगळवारी घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

राकेश रवी मादगुंडी (वय 7, रा. घर नंबर 240-1, अ विभाग, विडी घरकुल), अल्मश सरफराज पटेल (वय 6, रा. घर नंबर 185-3, विडी घरकुल, कुंभारी) अशी मृतांची नावे आहेत. राकेश व अल्मश हे दोघे समवयस्क मित्र दररोज एकत्र शाळेला जायचे. दुपारी मैदानात खेळायचे. दोघांची घरेही जवळच होती. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास खेळत-खेळत घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या खड्डय़ाजवळ पोहोचले. 15 फूट लांब आणि 10 ते 15 फूट खोल खड्डा ड्रेनेजसाठी खोदलेला आहे. चारही बाजूनी बांबूने संरक्षण दिले आहे. पण, लहान मुले त्यातून ये-जा करू शकत होती.

सोमवारी व मंगळवारी पडलेल्या पावसामुळे खड्डय़ात पाणी साचले होते. अचानक दोघांचा पाय घसरल्यामुळे ते पाण्यात बुडाले. सायंकाळनंतर दोघे घरी न आल्यामुळे दोघांच्या नातेवाइकांनी पहाटेपर्यंत शोध घेतला; पण ते सापडले नाहीत. पटेल याचे वडील सरफराज यांनी बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमाराला पुन्हा शोध सुरू केला. खड्डय़ाजवळून जाताना दोघा मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना त्यांना आढळून आले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहून ते गलितगात्र झाले. काही क्षणातच ही माहिती मादगुंडी यांच्या नातेवाइकांना कळाली. विडी घरकुलमधील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. वळसंग पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवले.

अल्मश हुशार होता
अल्मश हा अभ्यासात हुशार होता. त्याचे वडील सरफराज पटेल हे सिटू कार्यालयात काम करतात. आई गृहिणी असून, विडीकाम करते. नाजमीन नावाची सात वर्षांची बहीण आहे. या परिवारावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवारी दुपारीही घडली होती घटना
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमाराला एक पाच वर्षांचा मुलगा खेळता-खेळता पाण्यात पडला. ये-जा करणार्‍या नागरिकांनी पाहून त्याला पाण्यातून काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. काही तासांनंतर ही दुर्दैवी घटना त्याच ठिकाणी घडली.