आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामलवाडी रस्त्यावर दोघा मित्रांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर-तुळजापूर रस्त्यालगत तळेहिप्परगा येथील आयटीआयजवळ (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला लावून बोलत थांबलेल्या चौघा तरुणांना वेगाने जाणार्‍या कारने ठोकरल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी एकच्या सुमाराला घडला.

देविदास शिवाजी पाथरूट (वय 19), रवी राजू साखरे (वय 21, रा. दोघे मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) या दोघांचा मृत्यू झाला. नवनाथ मुदगुल (वय 18, रा. मड्डी वस्ती), विजय कदम (वय 31, खटाव, सातारा) हे दोघेजण जखमी झाले आहेत. नवनाथ याने सोलापूर तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोटारसायकल (एमएच 13 बीके 7826) चौघेजण तुळजापूरहून सोलापूरकडे येत होते. आयटीआयजवळ गाडी बाजूला लावून चौघे बोलत थांबले होते. सोलापूरच्या दिशेने येणार्‍या ओमनी कारने (एमएच 06 एएस 1335) ठोकरले. काही कळायच्या आत चौघेजण बाजूला फेकले गेले.

चौघांना शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर पाथरूट, साखरे या दोघांचा मृत्यू झाला. विजय आणि नवनाथ या दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त तरुण बांधकाम मिस्त्रीचे काम करतात. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. पंचनामा करून फिर्याद नोंदवून घेतली. मृतांच्या नातेवाइकांची शासकीय रुग्णालयात गर्दी झाली होती. कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय यादव तपास करत आहेत.