सोलापूर- मार्कंडेयरुग्णालयाजवळच्या मेडिकल दुकानात धनाजी माने (रा. तरटगाव, उत्तर सोलापूर) यांच्या पत्नीची बॅग तीन महिला चोरांनी पळवली. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमाराला घडली. जेल रोड पोलिसात त्यांनी फिर्याद दिली आहे. श्रीमती माने मेडिकलमध्ये गोळ्या घेत होत्या. तीन महिला आल्या. एकीने त्यांच्या पर्सवर टॉवेल टाकला. तो घेतल्यासारखे करत पर्सच पळवली. त्यात बारा हजार रुपये होते.
मार्कंडेय रुग्णालयाच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. ही चोरीची घटनाही त्यात कैद झाली असेल तर त्या आधारे चोरांचा शोध लागू शकेल. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करावा, गुन्हा उघडकीला येईल.
सिद्धेश्वरनगरात साडेतीन तोळे दागिने चोरीला
येथीलअण्णाराव बिराजदार (रा. सिद्धेश्वर नगर भाग ५, मौलाना आझाद चौक) यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील ऐवज चोरीला गेला. सोमवारी सायंकाळी ते परगावी गेले असता घराचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील साडेतीन तोळ्यांचे दागिने, पितळी भांडी चोरीला गेले. एमआयडीसी पोलिसांत मंगळवारी फिर्याद देण्यात आली आहे.
भूषणनगरात एक लाखाची घरफोडी
सलगरवस्ती परिसरातील भूषण नगरात राहणारे वीरपक्ष चलवादी यांच्या घरात चोरी झाली आहे. सलगर वस्ती पोलिसात त्यांनी फिर्याद दिली आहे. एक जानेवारी रोजी बाहेरगावी गेल्यानंतर कुलूप कोयंडा उचकटून तीन तोळे सोन्याचे दागिने, महागडा टीव्ही चोरीला गेला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बादोले हे अधिक तपास करत आहेत.