आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वाळू चोरांना सक्तमजूरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भीमा नदीपात्रातून तीन ब्रास वाळू ट्रकमधून चोरून नेल्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी एस. डी. कंकणवाडी यांनी राजेंद्र भीमराव पवार (वय 31, रा. तेरामैल), गणपत सिद्राम लोहार (वय 24, रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) या दोघांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा बुधवारी ठोठावली. मंद्रूपचे मंडल अधिकारी अ. रज्जाक मकानदार यांनी मंद्रूप पोलिसांत फिर्याद दिली होती. पवार याला 23 ऑगस्ट 2010, तर लोहार याला 8 ऑगस्ट 2011 रोजी अटक झाली होती. हे दोघे ट्रकमधून (एमएच 13 आर 3725 आणि एमएच 12 आरई 8440) वाळू नेताना वकडबाळजवळ कारवाई झाली होती. हवालदार भैरूरतन गायकवाड, सलीम शेख यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पवार व लोहार या दोघांना दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली. चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे अँड. एस. सी. शिंदे, आरोपींतर्फे अँड. नागेश खिचडे यांनी काम पाहिले.

प्राणघातक हल्ला; सात जणांचा जामीन फेटाळला
करमाळा तालुक्यातील खामगाव भीमा नदीपात्रात वाळू उपशावरून दिनेश वाळके (रा. इंदापूर, पुणे) यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सात जणांवर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांनी फेटाळला. राजेंद्र कवडे, शंकर कवडे, काका कवडे, अतुल गजरमल, गणेश यादव (रा. कात्रज, करमाळा), पुष्कर पिंपरे, स्वप्नील पिंपरे (रा. मदनवाडी, इंदापूर) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना 23 फेब्रुवारी 2013 रोजी घडली होती. बाहेरून येऊन वाळूचा ठेका का घेतला, आम्ही येथे बोटी लावून वाळू उपसा करणार आहोत, अशी दमदाटी करीत सर्वांनी मिळून दिनेश यांना मारहाण केली होती. पुष्पक याने तलवारीने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. सरकारतर्फे अँड. प्रवीण शेंडे, आरोपींतर्फे अँड. बी. डी. कट्टे यांनी काम पाहिले.

जातिवाचक शिवीगाळ; तिघांना सहा महिने शिक्षा
शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणात जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांना सहा महिन्यांची शिक्षा न्यायाधीश के. एस. व्होरे यांनी सुनावली. लक्ष्मण लांबतुरे (रा. सादेपूर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती. सुरेश मेनकाळे (वय 45, रा. लवंगी), शिवानंद बगले (वय 19, लवंगी), सिद्धाराम बगले (वय 50, रा. लवंगी, ता. दक्षिण सोलापूर) यांना शिक्षा झाली आहे. 21 नोव्हेंबर 2008 रोजी ही घटना घडली होती. शेताच्या बांधावरून लांबतुरे यांना तिघांनी मिळून मारहाण करून शिवीगाळ केली होती. सरकारतर्फे अँड. डी. के. लांडे, अँड. जाधव यांनी काम पाहिले.