आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींच्या समोरासमोरील भीषण धडकेत दोन ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर-वैराग या मार्गावरील वडाळ्यानजीकच्या वांगी ओढय़ाजवळ समोरासमोर दोन मोटारसायकलींची धडक बसून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. उमेश रमेश कटके (वय 22, रा. गवंडी गल्ली, वैराग), ऋषिकांत वैजीनाथ म्हमाणे (वय 22, रा. वडगावकाटी, ता. तुळजापूर) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात शनिवारी रात्री अकराच्या सुमाराला घडला.

सूरज लोहकरे यांनी सोलापूर तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. म्हमाणे हा मोटारसायकलवरून (एमए 13 एएन 1853) दोघा मित्रांसमवेत वडाळ्याहून सोलापूरच्या दिशेने येत होता. कटके हा सोलापूरहून वैरागकडे डबलसीट मोटारसायकलवरून (एमएच 13, बीजे 2563) जात होता. वडाळ्याजवळ आल्यानंतर दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही दुचाकीवरील म्हमाणे व कटके गंभीर जखमी होऊन मरण पावले. पद्मराज चुंगे, लोहकरे यांच्यासह तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर तालुका पोलिस घटनास्थळी पोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवले. रविवारी सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. साहाय्यक पोलिस निरीक्षक यादव, हवालदार राऊत अधिक तपास करीत आहेत. मृत म्हमाणे हा खासगी वाहनावर चालक होता. त्याच्या मागे आई, वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.

कटके कुटुंबाचा आधारच गेला
वैरागचा रहिवासी उमेश कटके हा शनिवारी रात्री सोलापूरहून वैरागला जाताना वडाळ्याजवळील अपघातात जागीच मृत्यू पावला. उमेश हा कमवता मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूने कटके कुटुंबीयाचा आधारच गेला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत नोकरीच्या मागे न लागता उमेशने मागील वर्षीच कर्ज काढून फोटोग्राफी व झेरॉक्सचा व्यवसाय सुरू केला होता. रविवारी विविध कार्यक्रमांच्या फोटो काढण्याची ऑर्डर असल्याने शनिवारी तो कॅमेरा दुरुस्तीसाठी सोलापूरला आला होता. परत जाताना मात्र वाटेतच काळाने गाठले. उमेशच्या मागे आई, वडील, लहान भाऊ व एक विवाहित बहीण आहे.