आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - देशाच्या विकासासाठी आता ‘रालोआ’चे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. केंद्रात आमचेच सरकार सत्तेत येईल, असा दावा करतानाच ‘रालोआ’तर्फे पंतप्रधानपदासाठी अद्याप कोणाच्याही नावाची चर्चा झाली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा तर विषयच येत नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना शिवसेनेतर्फे मदतीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी ठाकरे म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारमधील घोटाळे एकापाठोपाठ बाहेर येत आहेत. त्यामुळे येत्या वर्षात होणार्या लोकसभा निवडणुकीत रालोआचे सरकार सत्तेवर येईल. कर्नाटकातील निवडणूक निकालाचा देशाच्या एकूण परिस्थितीवर फारसा फरक पडणार नाही. कारण मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान येथील निवडणुका होणार आहेत. तेथे भाजपची सरकारे येतील. ती हवा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेली असेल, असा दावाही त्यांनी केला.
‘घोटाळ्यांबाबत राज्याची स्थिती केंद्रासारखीच आहे. सीबीआय केंद्राची पोपट असल्याचे न्यायालयानेच सांगितले. राज्यातही तीच स्थिती आहे. तपास यंत्रणा सरकारच्याच अखत्यारीत आहे. गुन्हे करणारे तेच, चौकशी करणारे तेच. मग अहवाल कसा येणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही,’ अशी टीकाही उद्धव यांनी केली. अजित पवारांबाबत ते म्हणाले, ‘त्यांच्या अकलेचा दुष्काळ अगोदर संपू दे.’ ‘नालायक’ शब्दालाही नालायक ठरवण्यासारखे ते बोलताहेत. सरकारमध्ये कोणाचा पायपोस नाही. 1972 पेक्षा भयंकर दुष्काळ असल्याचे पवार सांगतात, पण ते जाहीर करीत नाहीत, अशी दुटप्पी भूमिका आहे. घोटाळे अंगलट येतील म्हणून हे सरकार नव्या समस्या निर्माण करत असल्याचाच संशय येतोय, असे ते म्हणाले.
‘त्यांच्या मधुमिलनाचे आधी पाणी वाहू द्या’
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ‘राज आणि उद्धव’ यांच्यातील सेतू म्हणून मी भूमिका पार पाडेन, असे म्हटले होते. त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता ‘अगोदर त्यांच्यातील मधुमिलनाचे पाणी तर वाहू द्या’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील दुष्काळाबाबत केवळ सरकार नालायक आहे असे म्हणून आम्ही गप्प बसत नाही. आम्ही कामही करतो, असा टोलाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.
पवार महत्त्व वाढवून घेताहेत
मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता ठाकरे यांनी फेटाळली. यूपीएचे घटकपक्ष सरकारला ब्लॅकमेल करीत आपले महत्त्व वाढवत आहेत, अशा शब्दांत उद्धव यांनी शरद पवार यांच्या मध्यावधी निवडणुका होतील, या वक्तव्याचा समाचार घेतला.
आठवले बोललेच नाहीत
येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइंचे रामदास आठवले यांनी जागांची मागणी केली होती. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ‘रामदास आठवले हे माझ्याशी बोललेच नाहीत,’ असे उद्धव म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.