आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीला विरोधाने मनपांची स्वायत्तता धोक्यात- उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- लोकशाही देश असतानाही राज्यातील सरकार लोकांचे ऐकत नाही. एलबीटीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे. पण सरकार कोणताच तोडगा काढत नाही, अशी टीका करीत एलबीटीला विरोध झाला तर महापालिकांची स्वायत्तता धोक्यात येईल. त्यामुळे या प्रकरणी नेमका तोडगा निघेपर्यंत जकात चालू ठेवा, अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे रविवारी सोलापुरात आले होते. त्यानिमित्त हॉटेल सिटी पार्क येथे सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी एलबीटीच्या विरोधात व्यापार्‍यांच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की सरकार व्यापार्‍यांचे ऐकत नाही, महापालिकांचे ऐकत नाही आणि लोकांचेही ऐकत नाही. महापालिकांना उत्पन्नाचे साधन नसल्यास त्या धोक्यात येऊ शकतात, हे कोणी लक्षात घेत नाही. आता व्यापार्‍यांनी एलबीटीला विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकांची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते. सर्व महापौरांना एकत्र बोलावून एक परिषद घेण्याची सूचना मुंबईच्या महापौरांना केली आहे. महापलिकांची नेमकी भूमिका त्यातून स्पष्ट होईल. शासनाने समिती नेमून आढावा घ्यावा, त्यानंतर निश्चित एक निर्णय घ्यावा. तोवर जकात चालू ठेवावी ही आमची भूमिका आहे. त्यामुळे यात व्यापारी अथवा महापालिका यांच्यापैकी कोणाची बाजू घेण्याचा प्रश्‍नच नाही. पण महापालिकांतून विकासकामे झाली पाहिजेत ही भूमिका आहे. राज्य सरकारकडे महापालिकांचे जवळपास 2800 कोटी रुपये पडून आहेत. एलबीटी अथवा इतर करांच्या रूपाने राज्य सरकारकडे पैसा गेला तर तो महापालिकांकडे परत येण्याची शक्यता खूप कमी आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

व्यापारी महासंघ पदाधिकार्‍यांनी घेतली भेट
भारतात कुठेच नसलेला व भ्रष्टाचाराला वाव देणारा एलबीटी कर असल्याने तो रद्द करावा, या मागणीसाठी सोलापूर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर वनकुद्रे, राजू राठी आदींनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सकाळी भेट घेतली. व्यापारी महासंघाला शिवसेनेने सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका व्यापार्‍यांसमोर स्पष्ट केली.