आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी पाणीपुरवठा योजनेबाबत पालकमंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न - बनसोडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उजनी पाणीपुरवठा योजनेबाबत प्रश्न निर्माण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप नगराध्यक्षा रेविता बनसोडे यांनी केला आहे.

शहरातील नागरिकांना रोज पाणी मिळत नसल्यामुळे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उस्मानाबाद नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांना मंगळवारी (दि. 1) पाणीटंचाई आढावा बैठकीत धारेवर धरले. या पार्श्वभूमीवर बनसोडे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण पाणीपुरवठा योजनेचे 182 कोटी रुपये कोठे गेले, असे विचारून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. उस्मानाबादची जनता पाणीटंचाईने होरपळत असताना ही योजना मोठ्या प्रयासाने पालिकेने पूर्ण केली. टँकरचा खर्च 65 कोटी रुपये येत असल्याने योजनेसाठी 51 कोटी रुपये शासनाने पाठपुरावा करून मिळविले. माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी जनतेला पाणी मिळावे म्हणून ही योजना पूर्ण केली. पालकमंत्र्यांनी कोणतेही सहकार्य केले नाही.

श्रेय घेण्याचा प्रयत्न
51 कोटी मंजूर झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी बॅनरबाजी करून श्रेय मिळविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता माजी राज्यमंत्री पाटील यांच्यामुळे रक्कम मंजूर झाली. पालकमंत्री नाहक डिजिटल बॅनरबाजी करून आपली पाठ थोपटून घेत आहेत. वास्तविक पाहता त्यांनी नगरपालिकेला काहीही सहकार्य केलेले नाही, असा आरोपही बनसोडे यांनी केला.

एकमेव पालिका
देखभाल, दुरुस्ती व विद्युत देयकाची जबाबदारी दोन वर्षासाठी कंत्राटदारावर आहे. अशा पद्धतीने कंत्राट करणारी राज्यातील एकमेव पालिका आहे.

पालिकेवर भार
मंजूर 51 कोटीपैकी 30 कोटी मिळाले. 21 कोटी रुपये न मिळाल्याने कंत्राटदाराचे सहकार्य नाही. यामुळे पालिकेवरच वीजबिल व देखभालीचा भार आहे.

पाटलांचा पाठपुरावा
उर्वरित 21 कोटी मिळविण्यासाठी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, पालकमंत्री चव्हाण काहीही सहकार्य करत नाहीत.

पक्षाच्या बदनामीचा प्रयत्न
पालकमंत्री चव्हाण अकारण राष्ट्र वादी काँग्रेसला बदनाम करत आहेत. नगरपालिका केवळ राष्ट्र वादीच्या ताब्यात असल्यामुळे आधारहीन टिका करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही नगराध्यक्षा बनसोडे यांनी म्हटले.

विरोधी आमदाराला साथ
पालकमंत्री चव्हाण विरोधी पक्षाच्या आमदाराच्या सुरात सूर मिसळून टिका करत आहेत. उजनी योजनेचे पूर्ण पैसे मिळाले नसतानाही पैसा कोठे गेला, असे विचारून पालकमंत्री वैचारिक पातळी स्पष्ट करीत आहेत, असेही बनसोडे म्हणाल्या.

उस्मानाबादकरांना मुबलक पाणी नाही
४उस्मानाबादकरांना कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी मिळत नाही. म्हणूनच बैठकीत मुख्याधिका-यांना जाब विचारला. यामध्ये दुसरा कोणताही हेतू नाही. उस्मानाबाद पालिकेने 21 कोटी मिळाले नसल्याचे कधीही सांगितलेले नाही. यामुळे पैसे मिळविण्यासाठी मी कसे प्रयत्न करणार? 51 कोटी मिळवून देण्यासाठी मीच पाठपुरावा केला आहे.’’ मधुकरराव चव्हाण, पालकमंत्री.