आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. अन्यथा बारामतीत आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उजनी धरणातील पाणी 25 जुलैपर्यंत डाव्या व उजव्या कालव्यात तसेच आष्टी तलावात सोडावे, अन्यथा 25 जुलै नंतर बारामती येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल. या पाण्यासाठी मरण पत्करेन मात्र एक थेंब पाणी सुद्धा बारामतीला घेऊ देणार नाही, असा इशारा संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघात मंगळवारी आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, उजनी धरणाची निर्मिती सोलापूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठय़ासाठी करण्यात आली आहे. तरीही शासनाने सोलापूरकरांचा घसा कोरडा ठेवून डायनामिक्स डेअरी आणि इतर इंडस्ट्रिजना पाणीपुरवठा केला. याबाबत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डायनामिक्स डेअरीचा पाणीपुरवठा बंद केला.उजनीमध्ये पाण्याची कमतरता असतानाही पुण्यातील धरणामधून पाणी सोडण्यात आले नाही. त्यासाठी 121 दिवस उपोषण केले. उपोषणादरम्यान 22 मार्च रोजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी येत्या चार दिवसांत पाणी सोडण्याची हमी दिली. मात्र नंतर काका-पुतण्याच्या दबावामुळे त्यांनी पाणी सोडलेच नाही. त्यामुळे माझा या काका- पुतण्यावर राग आहे, याचा कोणीही दुसरा अर्थ काढू नये, असे आवाहन देशमुख यांनी या वेळी केले.

सोलापूरकरांच्या पाण्यावर दरोडा टाकणार्‍यांना धडा शिकवण्याकरिता तसेच शेतकर्‍यांना त्यांचा हक्क हिसकावणार्‍यांचा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी मी 2014 च्या निवडणुकीपूर्वी सर्वत्र धावता दौरा करणार आहे. या आंदोलनातून मी जनजागृती करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. याप्रसंगी साधना देशमुख, शकुंतला शिंदे, मालन वसेकर, पप्पू पाटील, आबा देढे आदी उपस्थित होते.

प्रथम उजनी भरा, अन्यथा जनहित याचिका
आमदार बबनराव शिंदे यांनी कंदर बोगद्यात पाणी सोडले. आमदार शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी सोलापूरकरांचे पिण्याचे पाणी वळवून घेतले. म्हणूनच येथील जनतेला तीन महिने दुष्काळ सहन करावा लागला. तसेच उजनी धरण भरण्यापूर्वी पुण्यातील अकरा धरणे भरली जातात. परंतु यंदा असे न करता प्रथम उजनी भरा नंतर बाकीची धरणे भरा. असे न झाल्यास जनहित याचिका दाखल करणार, असेही देशमुख यांनी सांगितले.