आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनधिकृत विक्रेत्यांचा रेल्वे पोलिस ठाण्यात धुडगूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे स्थानकावरील अनधिकृत पाणी विक्रेत्यांनी रेल्वे पोलिस (आरपीएफ) ठाण्यावरच हल्ला केला. एका पोलिसाला मारहाण केली. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. रेल्वे पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली आहे. रेल्वे स्थानकावर अनधिकृतपणे पाणी विक्री करणाऱ्या तौफिक अब्दुल रहमान शेख (वय ३०) दस्तगीर अब्दुल रहमान शेख (वय ३२, रा. दोघेही न्यू धोंडिबा वस्ती, रामवाडी) यांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. आरपीएफचे पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिंदे यांनी अनधिकृत पाणी विक्री केल्याच्या कारणावरून जराड नावाच्या इसमाला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले होते. दरम्यान शेख बंधू त्यांचे सहकारी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी शिंदे यांना मारहाण करून ठाण्यातील खुर्च्यांची मोडतोड केली.या वेळी ठाण्यात एच. एस. राठोड ड्युटीवर होते. घटनेमुळे काही काळ ठाण्याच्या परिसरात तणाव होता. रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे. त्यावर रेल्वे विभागाचे आणि पोलिसांचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यातूनच आजचा प्रकार घडला. गेल्या आठवड्यातच विक्रेत्यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. शुक्रवारच्या घटनेने पोलिसांनाच टार्गेट केले गेले. घटनेनंतर पोलिस निरीक्षक अरुण वायकर, वसंतराव गायकवाड, संजय जगताप अशा तीन वेगवेगळ्या ठाण्याचे पोलिस निरीक्षक रेल्वे पोलिस ठाण्यात जमा झाले होते. या प्रकरणात आणखी काहीजण होते. ते कोण आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यांची नावे निष्पन्न व्हायची आहेत. रात्री उशिरा नोंद घेण्याचे काम सुरू होते.
पोलिसच असुरक्षित
रेल्वेस्थानकावरील अनधिकृत विक्रेत्यांवर नियंत्रण आणण्यात रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी कायमचा उपाय करायला हवा, पण तो केला जात नसल्याने सातत्याने दहशतीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. पोलिसांकडून प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जाणे अपेक्षित आहे, पण पोलिसांवरच्या हल्याने एकूण यंत्रणेबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...