आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Building In Fort Premises Issue At Solapur

‘पुरातत्त्व’च्या अटीत अडकल्या इमारती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- किल्ल्यापासून 100 मीटर परिसरात इमारतीचे बांधकाम करावयाचे नाही व त्यापुढच्या 200 मीटर परिसरात जुजबी दुरुस्ती करता येईल, असा कायदा 2010 पासून अंमलात आल्याने शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या नवीपेठ, दत्त चौक , किल्ला परिसारतील इमारती कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. पुरातत्त्व खात्याच्या या कायद्यात दुरुस्ती करावी यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर झाला आहे.

केंद्र सरकारने पुरातन काळातील इमारतींच्या संरक्षणासाठी 1958 मध्ये कायदा अंमलात आणला होता. त्यात 1992 ला दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. त्यात मात्र किल्ला परिसरातील 100 मीटरचा परिसर प्रोटेक्टेड एरिया (संरक्षित) म्हणून जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परिसरात नवीन कसलेली बांधकाम 2010 पासून करता येणार नाही असा नियम केला गेला. तर पुढच्या 200 मीटरचा परिसर (किल्ल्यापासून 300 मीटरचा) रेग्युलेटेड एरिया म्हणून जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परिसरात केवळ इमारतींची जुजबी द्रुुस्ती करण्यासाठीच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.

2010 पूर्वी (कायदा अंमलात येण्यापूर्वी) नवीपेठ, आसार मैदान व परिसरात अनेक बांधकामे, मोठय़ा इमारतींची उभारणी झाली. नवीपेठ ही मोठी बाजारपेठ असल्याने अनेक नवीन कॉम्प्लेक्सचे प्रस्ताव आहेत, पण पुरातत्त्व खात्याच्या बंधनांमुळे तो अंमलात येऊ शकत नाही, असे सध्याचे चित्र आहे. 2010 मध्ये ज्या इमारतींचे बांधकाम चालू होते त्याही इमारती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह, जागा, इमारत मालक अडचणीत आले आहेत. कायद्याचा अंमल झाल्यानंतर किल्ल्यापासून 300 मीटरपर्यंतच्या परिसात तसे सूचना फलक लावण्यात आले.

महापालिकेकडे बांधकाम परवाना मागताना पुरातत्त्व खात्याचे ना हकरत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मिळत नसल्याने नव्या इमारती उभारणे अशक्य झाले आहे. या परिसरात जवळपास 130 इमारतींना नवीन बांधकामे करावयाची आहेत. यातील काही इमारती जुन्या आहेत. त्या कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या बाजूला सरस्वती चौक ते चार पुतळा रस्त्यावरील आमच्या इमारतीला मनपाचा बांधकाम परवाना मिळाला होता, बांधकामही पूर्ण होत आले होते. ते चालू असतानाच 2010 मध्ये पुरातत्त्व खात्याचा कायदा आला आणि ते तेथेच थांबवावे लागले. मात्र या परिसरात अनेक बांधकामे आहेत, येथून किल्ल्याची कोणतीच बाजू दिसत नाही. तरीही बांधकामे अर्धवट राहिली आहेत. कायद्यात दुरुस्तीची गरज आहे.’’ प्रशांत जोशी, बांधकाम व्यावसायिक

पुरातत्त्व विभागाने घातलेल्या बंधनांमुळे मिळकतदारांना त्यांच्या जुन्या, पडक्या घरातच राहवे लागत आहे. खासगी वा सरकारी कोणतीच विकासकामे होणार नाहीत. शिवाय जाचक कायद्यामुळे किल्लय़ाच्या 100 मीटर परिसरात दुकानदारांना पत्र्याचे शेड मारून व्यवसाय करावे लागत आहेत. हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती व्हावी .’’ संतोष नागेश सुरवसे, उद्योजक

नवीन नोटिफिकेशनची प्रतीक्षा
पुरातत्त्व विभागाने मुंबई सायन येथे नवीन कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयातर्फे महाराष्ट्रातील पुरातन काळातील इमारतींच्या परिसरात नव्या नियमांबाबतच्या अंमलबजावणीचे काम आहे. परिसरातील बांधकामांना काही अटी घालून परवानगी देण्याचा परवानगी देण्याबाबतचा विचार पुरातत्त्व खात्याकडून सुरू झाला आहे. त्यासाठी इमारतींची उंची, इमारतीची सध्याची स्थिती, नवीन बांधकामाची गरज किती हे पाहून त्याबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव आहे. तो दिल्ली येथील पुरातत्त्व खात्याच्या मुख्य कार्यालयाकडे सादर झाला आहे. पुरातत्त्व खात्याचे मुख्य सचिव हिमांशु प्रभारे (दिल्ली) यांच्याकडे आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे नोटिफिकेशन लवकर निघेल असे सांगितले जाते. या नोटिफिकेशनची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

सौंदर्याला बाधा येणार नाही
किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा येऊ नये, असा पुरातत्त्व खात्याचा मूळ हेतू आहे. त्या हेतूनेच बांधकामांवर बंधने आणली गेली. ती मुळातच चुकीची आहेत. कारण सोलापूरच्या किल्ल्याच्या बाजूने रस्तेच आहेत. त्यामुळे किल्ल्याचे दर्शन होतेच. समोरील रस्त्याच्या कडेला बांधकामे केल्याने किल्ल्याच्या सौंदर्याला कोणती बाधा येते हे न कळणारे आहे. इमारतींची बांधकामे रखडल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे.’’ धनंजय माने, ज्येष्ठ विधिज्ञ

प्रस्ताव दाखल केला
सोलापुरातील किल्ला परिसरातील बांधकामांसंदर्भातील गरजा कशा पूर्ण करता येतील, याबाबतचा विचार चालू आहे. त्यासाठी नियमात दुरुस्ती करावी लागणार आहे. तसा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात नवीन नियम असणार आहेत. मंजुरीला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. केंद्र सरकारने (बॉयलॉज) नियमावली तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्या लवकर होतील.’’ मयूर ठाकरे, सर्कल ऑफीसर, पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र, सायन-मुंबई

2010 पूर्वी नवीपेठेत उभारण्यात आलेली अनेक बांधकामे रखडली
किल्ल्यापासून 100 मीटर परिसरात कसलेही बांधकाम करता येत नाही, असे बंधन पुरातत्त्व खात्याने घातले आहे. मात्र व्यापारपेठ असलेल्या नवीपेठ, दत्त चौक परिसरात पत्र्याचे शेड उभारली जात आहेत.