आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under Copyright Act 8 Mobile Shops Owner Arrest In Solapur

कॉपीराइटचा भंग केल्यावरून 8 मोबाइल विक्रेते अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सॅमसंग कंपनीचे सॉफ्टवेअर दुसर्‍याच कंपनीच्या मोबाइलमध्ये अपलोड करून देणार्‍या आणि सॅमसंग कंपनीचे बनावट लेबल लावून मोबाइल विक्री करणार्‍या सहा जणांना अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री सातच्या सुमाराला कंपनीचे तपास अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. प्रल्हाद मरनप्पा चौधरी (वय 27, रा. स्वस्तिक स्वीट होमजवळ), केसाराम मकनाजी देवासी (वय 26, नवजीवन नगर), मच्छिंद्र अंबादास काळे (वय 28, तेजस्वी नगर, आसरा) या तिघांना अटक झाली.

चौपाडमधील ठेकेदार कॉम्लेक्समध्ये उल्लेखित तिघांनी मिळून सॅमसंग कंपनीचा रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा वापर करून कॉपीराइट अधिकाराचे उल्लंघन केले आहे. सव्वालाख किमतीचे सॅमसंग मोबाइल, अँक्सेसरीज साहित्य दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले आहे.

दुसर्‍या घटनेत समाचार चौकातील मुस्कान मोबाइल शॉपी, आइशा इलेक्ट्रॉनिक्स व नोबेल कस्टम या दुकानातही कंपनीच्या तपास अधिकार्‍यांनी छापा मारून कारवाई केली. मेहबूब अनवर पटेल (वय 38, शुक्रवार पेठ), महमद जासीद महमदअली जमादार (वय 27, शनिवार पेठ), चंद्रकांत मळकप्पा सग्गम (वय 62, विडी घरकुल) यांच्यावर कारवाई झाली. एक लाख तीस हजार रुपयांचे सॅमसंग कंपनीचे मोबाइल, साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन्ही घटनांची फिर्याद जेल रोड व फौजदार चावडी पोलिसात सूर्यकांत खरात (कंपनी तपास अधिकारी, चर्चगेट, मुंबई) यांनी दिली आहे. या दुकानातही सॅमसंग कंपनीचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क कॉपीराइट अँक्टखाली कारवाई झाली आहे.

तिसर्‍या घटनेत गॅलक्सी संगणक वैभव एंटरप्रायजेस (कन्ना चौक) येथे कारवाई झाली. जितेंद्र रिकामे (चर्चगेट, मुंबई) यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण नथ्थू रिकामे (वय 21, एमआयडीसी आशा नगर), श्रीकांत दत्तात्रय बिडवे (रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एकवीस हजार किमतीचे टोनर व प्रिंटर जप्त करण्यात आले आहेत. दोघेजण मिळून एचपी कंपनीचा संगणक रजिस्टर्ड ट्रेडमार्क कॉपीराइट अँक्ट नियम तोडून कंपनीचे बनावट टोनर व प्रिंटर ग्राहकांना विकण्यासाठी ठेवण्यात आल्याचे आढळले.

फौजदार गायकवाड तपास करीत आहेत. तीनही घटनांमधील आठजणांना अटक केल्यानंतर त्यांना बुधवारी जामीन मंजूर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिकृत सॉफ्टवेअरच घ्या
कायद्यानुसार अपलोड करून घेणार्‍यांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी कंपनीच्या अधिकृत ठिकाणीच सॉफ्टवेअर घ्यावे. बनावट साहित्य घेऊन ग्राहकांनी फसवणूक करून घेऊ नये. स्वस्तात साहित्य कुणी देत नसते. त्यामुळे खात्री करून घ्या.’’ अरुण वायकर, पोलिस निरीक्षक

यापासून सावधान..!
कोणत्याही कंपनीचा सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना ठरावीक प्रकारची ‘की’ संबंधित साइटवर दिलेली असते. शिवाय काही नागरिकांकडून मूळ कंपनीचे वेब पेजच कॉपी करण्यात आलेले असते. याला न भुलता देण्यात आलेली ‘की’ त्याच कंपनीच्या सॉफ्टवेअरची आहे की बनावट आहे हे दुसरा विंडो ओपन करून क्रॉस चेक करावे. यावरून त्या वेबसाइटवर दिलेली ‘की’, ‘सॉफ्टवेअर’, ‘लिंक’ खरी आहे की बनावट आहे लगेच समजू शकेल.

यामुळे झाली कारवाई.!
सॅमसंग कंपनीचे सॉफ्टवेअर दुसर्‍याच कंपनीच्या मोबाइलमध्ये अपलोड करणे, सॅमसंग कंपनीचे बनावट लेबल लावून मोबाइल विक्री, कंपनीचे नियम तोडून बनावट टोनर व प्रिंटरची विक्री.

कॉपीराइट अँक्ट म्हणजे काय?
एखाद्या कंपनीचे हक्क दुसरे कुणी विनापरवानगी वापरत असतील तर तसे करणे कॉपीराइट कायद्याचा भंग ठरते. संबंधित कंपनीवर कॉपीराइट अँक्टखाली कायदेशीर कारवाई होऊ शकते. एखाद्या मोबाइल कंपनीचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून दुसर्‍या कंपनीच्या मोबाइलमध्ये अपलोड करणार्‍यावर कारवाई होऊ शकते. कंपनीचे बनावट लेबल लावून साहित्य विक्री करताना कंपनीच्या तपास अधिकार्‍यांनी कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणले.