आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ सत्र परीक्षेसाठी पूर्वीची पद्धत ठेवा; आंदोलनाचा पवित्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने सत्र परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल केल्याने अनुत्तीर्ण होणार्‍या 40 ते 50 टक्के विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. याबाबत सिनेट सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांसह दोन विद्यार्थी संघटनांनी सोलापूर विद्यापीठाला निवेदन देऊन झालेला बदल रद्द करण्याची मागणी केली आहे.

सिनेट सदस्य डॉ. अनिल बारबोले, प्रा. एस. बी. विभुते, प्रा. आर. बी. शिंदे, माणिक कोकरे, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. शिवाजी शिंदे, शंकर चौगुले, डॉ. तानाजी कोळेकर यांच्यासह प्रा. मोहन चौगुले, डॉ. सोपान जावळे, प्रा. देवेंद्र आदमाने, डॉ.आर. बी. ढवण यांच्यासह 400 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला निवेदन देऊन पूर्वीची सत्र पद्धत ठेवण्याची मागणी केली.

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित रासे, जिल्हा संघटक अतिश सिरसट, रवी मेळ्ळे, विजय थोरात, सिंदबाज सय्यद, मोहसीन शेख, अतुल मस्के, महेश धेंडे यांनी विद्यापीठाला स्वतंत्र निवेदन दिले. यापूर्वीच एस.एफ.आय.चे दत्ता चव्हाण यांनीही निवेदन देऊन नव्या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या सत्राचे पेपर दिलेले असतात. ते पूर्णपणे सुटतील याचीही शाश्वती विद्यार्थ्यांना नसते. रिचेकिंग केव्हा करणार, त्याचा निकाल केव्हा येणार, तो पर्यंत कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा? हे विद्यार्थ्यांनाच समजणार नाही. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा परीक्षा विभागावरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तो विद्यार्थ्यांचा हिताचा नाही. एखादा विषय राहिला तर त्यास पुढील सत्रात परीक्षा देण्याची संधी मिळाली पाहिजे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

परीक्षा सत्रात असा झाला बदल
चालू शैक्षणिक वर्षापासून परीक्षा विभागाचे काम कमी करण्याच्या दृष्टीने थोडा बदल केला आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या सत्रात 1, 3 व 5 या सत्रांच्या परीक्षा तर मार्चच्या दुसर्‍या सत्रात 2, 4 , 5, व 6 या सत्राच्या परीक्षा होतील. म्हणजे ऑक्टोबरमध्ये नापास झाला तर विद्यार्थी पुढील ऑक्टोबरलाच तो पेपर सोडवू शकेल. मार्चला नाही. म्हणजे परीक्षा देण्याची एक संधी कमी झाली.