आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचे सांस्कृतिक विश्व उदास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे कार्य एकेकाळी सुवर्ण शिखरावर होते. ही ऊर्जा, हा उत्साह, हा दबदबा एक वर्षापासून कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक अंग विकसित आणि समृद्ध करण्याची जबाबदारी विद्यार्थी कल्याण मंडळाची असते. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ निवड, युवा महोत्सव आणि महाविद्यालयांचे वार्षिक अंक प्रकाशन असे उपक्रम राबवण्याची जबाबदारी या मंडळाकडे असते. याचे कामकाज मंडळाचे संचालक पाहतात. त्याची धुरा वर्षापासून प्रा. प्रशांत नलावडे यांच्याकडे आहे. यापूर्वी ती जबाबदारी सलग पाच वर्षे प्रा. डॉ. संजय नवले यांच्याकडे होती. युवा महोत्सवातील सहभागाचा त्यांचा 27 वर्षांचा अनुभव होता.

मंडळाचा महत्त्वाचा उपक्रम युवा महोत्सव. तो विद्यार्थ्यांसाठी जीव की प्राण. सुमारे दोन हजार विद्यार्थी त्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असतात. विद्यापीठाच्या स्थापनेपासून युवा महोत्सवाच्या नेटक्या आयोजनाची चढती कमान राहिली आहे. अर्थात काही प्रतिकूल घटनांचा अपवाद वगळता. पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवात ‘दादा’ मानल्या गेलेल्या मुंबई आदी विद्यापीठाच्या संघांना काही इव्हेंटमध्ये मागे सारण्याचे विक्रमी काम विद्यार्थ्यांनी केले आहे. मात्र, यंदाच्या दहाव्या युवा महोत्सवाच्या नियोजनात उणिवा राहिल्या. इव्हेंटच्या परिक्षकांच्या पातळीवर गोंधळ होताच. तर निरोप घेताना विद्यार्थ्यांना खिचडीवर भागवावे लागले.

युवा महोत्सव काळात घडली अप्रिय घटना
यंदाही दहाव्या महोत्सवात विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावण्यात धडक मारली. लोकमंगल जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात झालेला हा महोत्सव नियोजनाबाबत अनेक उणिवांचा ठरला. शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणानंतर नाराज विद्यार्थ्यांनी टोकाची भूमिका घेत हाणामारी केली. दुसºया क्रमांकाचे सर्वसाधारण विजेते ठरलेल्या वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे घेतली नाही. सर्व बक्षिसे गोळा करून महाविद्यालयापर्यंत पोचवण्यात आली. मात्र, अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांवर टाकलेला विद्यार्थ्यांचा बहिष्कार आजही कायम आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे जुजबी प्रयत्न झाले. मात्र, त्यांची भावना समजून घेत त्यांना जवळ करणे विद्यापीठास जमलेले नाही. त्यामुळेच विद्यापीठाच्या सांस्कृतिक विश्वावर उदासीची छटा आहे. 160 पेक्षा जास्त महाविद्यालयांत असलेले सर्व विद्यार्थी आपले अशी भूमिका त्यात असली पाहिजे. त्याच सूत्राने विद्यार्थ्यांमधील नाराजी दूर करता येऊ शकेल.

दुहेरी जबाबदारी अडचणीची?
विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीचे ढिसाळ नियोजन झाले. याचेही पडसाद उमटले. मात्र, दखलच न घेण्याचे विभागाने ठरवले असल्याने यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. प्रा. नलवडे यांना त्यांच्या महाविद्यालयीन कामाचा भार हलका झालेला नसल्याने उरलेल्या वेळेत ते मंडळाचे कामकाज सांभाळत आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे त्यांची अडचण होत आहे.

आगामी काळ कसोटीचा
इंद्रधनुष्य युवा महोत्सवात दरवर्षी सात ते आठ पारितोषिके पटकावणारा सोलापूर संघाला यंदा चार पारितोषिके पटकावता आली. पश्चिम विभागीय महोत्सवातही चार पारितोषिके. एकेकाळी राष्‍ट्रीय युवा महोत्सवात उत्तम कामगिरी बजावणारे सांस्क़ृतिक विभागाला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी यापुढील कालावधी कसोटीचा असेल हे निश्चित.