आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठांची ‘सत्त्व’परीक्षा!, विद्यार्थ्यांमध्येही चिंता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठासह राज्यभरातील प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम परीक्षा कामकाजावर पडेल. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशनने(एमफुक्टो) राज्यातील नेट-सेटमुळे अडचणीत आलेल्या प्राध्यापकांचे प्रश्न आणि अन्य 12 मागण्यांसाठी विद्यापीठाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. विद्यापीठातर्फे 28 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक तर 12 मार्चपासून लेखी परीक्षा सुरू होत आहेत. त्यावर प्राध्यापकांच्या बहिष्काराचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. एमफुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. भारत जाधव म्हणाले, ‘दुष्काळी परिस्थिती असल्याचे कारण सांगत राज्यशासन वेळकाढूपणा करीत आहे.

प्राध्यापकांच्या 1992 पासूनच्या रास्त मागण्यांना हरताळ फासला जात आहे. केंद्राने प्राध्यापकांचे अँरिअर्स देण्याची सूचना देऊनही राज्यशासन आश्वासन पाळत नाही. आंदोलन करणार्‍या प्राध्यापकांकडेच बोट दाखवत प्राध्यापकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे. अनेकदा विद्यार्थी संघटनांना पुढे करून आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला जातो. हे योग्य नाही.’

आंदोलनाचा परिणाम परीक्षेच्या कामकाजावर पडण्यापूर्वी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करताना डॉ. साळुंखे म्हणाले, पेपर सेटिंगचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा यंत्रणेतील प्राध्यापकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. अर्थात तोपर्यंत या प्रकरणी निश्चित तोडगा निघायला हवा. अन्यथा या आंदोलनामुळे परीक्षा यंत्रणेवर परिणाम होईल. गतवर्षी केलेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्राध्यापकांनी संप मागे घेतला होता.

विद्यार्थ्यांचा विचार आहेच..
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. पुणे, मुंबई विद्यापीठांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. तेथे पर्यायी प्राध्यापकांसमवेत तोडगा काढला गेला आहे. मात्र, लेखी परीक्षेच्या तोंडावर या बहिष्कार अस्त्राचा परिणाम तीव्रतेने जाणवणार आहे. ती वेळ येण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा विचार करून प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून तोडगा काढण्याची गरज आहे, असे प्रा. जाधव यांनी सांगितले.

...तर बहिष्कार सुरूच राहील
मागण्या मान्य होईपर्यंत राज्यभरातील प्राध्यापक विद्यापीठ परीक्षांवर बहिष्कार सुरू ठेवतील. सोलापूर विद्यापीठ परीक्षांवर 100 टक्के बहिष्कार टाकण्यात आला आहे. प्रा. भारत जाधव, एमफुक्टो उपाध्यक्ष