आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा आषाढी वारीचे नियोजन अमेरिकन पॅटर्ननुसार, ‘IRS’ प्रणाली वापरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अमेरिकेतील आयआरएस (इनसिंडन्स रिस्पॉन्स सिस्टीम) व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर यंदाच्या आषाढी सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. अमेरिकेत अधिक लोक जमणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन आयआरएस प्रणालीद्वारे केले जाते.
‘आयआरएस’ म्हणजेच आपत्ती प्रतिसाद व्यवस्थापन प्रणाली यापूर्वी देशात वनविभागाने राबवली होती. यानंतर प्रथमच आषाढी सोहळ्यासाठी ही यंत्रणा वापरली जाणार आहे. याचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले. यात्रेतील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये, अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त असतोच. मात्र यात्रेतील वारकऱ्यांची संख्या पाहता पालखी तळ, पंढरपूर शहरातील गर्दी व मंदिर परिसरात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आयआरएस प्रणालीचा आधार घेऊन नियोजन केले अाहे.

सर्व विभागांचा समावेश
या प्रणालीच्या माध्यमातून वारीमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व विभागांचे एकत्रित नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक विभागप्रमुखांना त्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. एखाद्या विभागाकडून दिलेली जबाबदारी कर्मचाऱ्यांकडून पार पाडली नाही तर संबंधित कर्मचाऱ्याऐवजी त्याच्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय वारीकाळात उद््भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीचे व्यवस्थापन व त्या आपत्तीला प्रतिसाद देण्याचे काम करण्यात येणार.

अशी असणार यंत्रणा...
{१४ नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून सर्व संतांच्या पालख्या आल्यापासून ते परत जाईपर्यंत नियोजन केले जाणार.
{०५ नियंत्रण कक्ष पंढरपूर शहरामध्ये राहणार असून, त्याचा मुख्य नियंत्रण कक्ष शिवाजी चौकात उभारण्यात येणार आहे.
{विविध विभागांची जबाबदारी, जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार आहेत.
-आरोग्य विभाग ते अग्निशामक दलाचा यात समावेश असून, याची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे असणार आहे.
-संपूर्ण यात्रा कालावधीत आपत्कालीन कायद्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदारी देण्यात येणार आहे.
-जिल्हाधिकारी हे अपर जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतील, तर अपर जिल्हाधिकारी नियुक्त केलेल्या सर्व विभागप्रमुखांकडून रोजच्या रोज आढावा घेणार आहेत.

नियोजन पूर्ण
आयआरएस सिस्टिमद्वारे यंदा आषाढी वारीमध्ये नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्या दिवशी काय करायचे, काय जबाबदारी आहे, याचा स्वतंत्र चार्ट तयार केला आहे. आयआरएस प्रणालीची तंताेतंत अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.”
विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी