आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uudhav Thackeray Rally News In Marathi, At Solaur

उद्धव ठाकरेंच्या स्वागतावेळी इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन पण उद्धव आले अन् न बोलताच गेले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी सोलापुरात जोरदार स्वागत झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी दमदार शक्तिप्रदर्शन करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. स्वागताचे निमित्त असले तरी तयारी मात्र विधानसभेसाठीची असल्याचे दिसत होते. मोटारसायकल रॅली, घोषणाबाजीमुळे वातावरण दणाणून गेले होते.

रविवारी सकाळी साडेअकरा वाजेपासूनच शिवसैनिकांनी विमानतळाच्या परिसरात गर्दी केली होती. विधानसभेसाठी इच्छुक असलेले युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर आपल्या सर्मथकांसह विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर माजी आमदार रविकांत पाटील यांचे चिरंजीव विराज पाटीलदेखील शेकडो शिवसैनिकांसमवेत मोटारसायकल रॅलीद्वारे विमानतळ परिसरात दाखल झाले. गळ्यात भगवे उपरणे घातलेले, हातात भगवा झेंडा घेऊन उद्धव ठाकरेंचा जयजयकार करत ते सारे दाखल झाले. त्यानंतर कुंभारीचे रामचंद्र होनराव यांनीदेखील शक्तिप्रदर्शन केले. सुनील कामाठी यांनीदेखील ‘हम भी कुछ कम नही’ असे दाखवत शेकडो शिवसैनिकांना घेऊन विमानतळ परिसरात गर्दी केली. उद्धव ठाकरे यांचा दौरा अन् नेत्यांचे शक्तिप्रदर्शन असेच चित्र पाहावयास मिळाले.

उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी शिवसैनिकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी काही निवडक कार्यकर्त्यांनाच विमानतळावर प्रवेश दिला. उरलेले सारे शिवसैनिक विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहिले. उपस्थित शिवसैनिकांमध्ये मात्र चांगलाच उत्साह जाणवत होता. शिवसैनिकांची इतकी संख्या होती की, जणू विमानतळाला शिवसैनिकांचा गराडा पडल्याचे भासत होते.

रविवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी जुहू विमानतळावरून उद्धव ठाकरे हे विशेष विमानाने सोलापूरकडे निघाले. 1 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे विमान सोलापूर विमानतळावर उतरले. या वेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर व अन्य एक मुलगा होता. विमानतळावर स्वागतासाठी शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर, जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, माजी आमदार शिवशरण पाटील, उत्तमप्रकाश खंदारे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, युवा सेनेचे गणेश वानकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी काही शिवसैनिकांनी राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
विमानतळाला शिवसैनिकांचा गराडा
उद्धव आले अन् न बोलताच गेले

उद्धव ठाकरे यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलतील, असे वाटत होते. मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते काहीच न बोलता गाडीत बसून निघून गेले.