आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका : पाच मुख्य पदे भरण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेतील काम व्यवस्थित व्हावे याकरता महापालिकेतील पाच महत्त्वाची पदे भरण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सार्वजनिक आरोग्य अभियंता, साहाय्यक नगर रचना, मुख्य लेखापरीक्षक, परिवहन व्यवस्थापक, अारोग्य अभियंता ही पाच पदे भरण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याचप्रमाणे स्मशानभूमीच्या ठिकाणी फक्त सुधारणा करून चालणार नाही. तेथे व्यवस्थापन हवे. त्यामुळे तेथे चालणाऱ्या अवैध प्रकाराना आळा बसेल. ज्या त्या समाजाकडे स्मशानभूमीची जबाबदारी सोपवण्यात येईल. कुठल्याही समाजाच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही, असा विश्वास आयुक्त काळम- पाटील यांनी व्यक्त केला.

३० अभियंत्यांची कंत्राटी पद्धतीने भरती

झोनचे काम हलके करण्यासाठी आणि नागरी सुविधा वेळेवर पोहोचवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ३० इंजिनिअरची निवड करण्यात येणार आहे. यानंतर यांची झोननिहाय नियुक्ती केली जाईल. तसेच, परिवहनमध्ये चालक आणि वाहकांचीही भरती केली जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

एलबीटीचे विवरण पत्र नाही, भरल्यास फौजदारी

एलबीटीचे विवरण पत्र जोपर्यंत भरले जात नाही तोपर्यंत व्यवसायाची माहिती कळणार नाही. हा मार्ग रीतसर आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी विवरण पत्र भरून एलबीटी भरावी, अन्यथा फौजदारी दाखल करणार, असा इशारा आयुक्तांनी दिला. जास्तीत जास्त एलबीटी वसूल करण्यासाठी साहाय्यक आयुक्त अमिता दगडे पाटील यांची मदत घेण्यात येणार आहे. सोने व्यापाऱ्यांकडून विवरण पत्र भरण्यास प्रतिसाद मिळत नाही. तसेच, विक्री केलेल्या मालाची माहिती घेऊन डिमांड नोटीस देणार, असेही आयुक्तांनी सांगितले. जे करायचे आहे ते नियमाच्या चौकटीत राहूनच करणार. जेणेकरून या नियमातून कोणी सुटू नये, असे आयुक्तांनी सांगितले.

नागरिकांना हेलपाटे मारायला लावू नका

जी कामे झोननिहाय किंवा ज्या त्या विभागात व्हायला पाहिजेत ती तेथेच व्हायला पाहिजेत. नागरिकांना माझ्यापर्यंत यायची वेळ येऊ नये. माझ्यापर्यंत जो कोणी येतो तो हेलपाटे मारून वैतागूनच आलेला असतो. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे वेळेवर करावीत, असा इशारा आयुक्तांनी या वेळी दिला.