आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगुलांबिका पतसंस्थेत तोडफोड; पोलिसांनी दप्तर घेतले ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गणेश पेठेतील हिंगुलांबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांची रक्कम मिळत नसल्याने बुधवारी तोडफोड झाली. संस्थेतील कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी साखर पेठ पोलिसांनी दप्तर ताब्यात घेतले. सहकार खात्याकडून फिर्याद नोंदवल्यास संबंधितांवर गुन्हे नोंदवणार आहे,असे पोलिस उपनिरीक्षक अरुण देवकर यांनी सांगितले.

या संस्थेच्या माध्यमातून २९ लाख रुपये ठेवी जमा झाल्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर कर्जे वाटण्यात आली. साधारण ३९ लाख रुपयांची कर्जे असल्याचा अंदाज सहकार खात्याने व्यक्त केला. परंतु त्याची वसुली होत नाही त्यामुळे ठेवीदारांची रक्कम परत देणे अशक्य झाले. गेल्या काही दिवसांपासून ठेवीदारांनी रक्कम घेण्यासाठी तगादा लावला.

व्यवस्थापक जीवन सरवदे यांना शिवीगाळ करण्यात आली. बुधवारी काही जण संस्थेत घुसले. त्यांनी तोडफोड केली. त्यानंतर काही ठेवीदार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी साखर पेठ पोलिस चौकीत आले. पोलिसांनी सहकार खात्याकडून फिर्याद घेणार असल्याचे सांगितले. श्री. देवकर यांनी तातडीने शहर उपनिबंधक बी. एस. कटरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी संस्थेचे रेकॉर्ड (दप्तर) ताब्यात घेतले. त्यानंतर संस्थेला टाळे ठोकण्यात आले.

कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी ताब्यात
संतप्त ठेवीदारांनी संस्थेत तोडफोड केली. कागदपत्रांचे नुकसान होऊ नये याकरता ते ताब्यात घेतले. शहर उपनिबंधकांना त्याची कल्पना दिली. केवळ कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी हे काम केले. पुढील कारवाई सहकार खात्याने करावयाची आहे. या खात्याकडून कोणी फिर्याद दिली तर पुढील तपास करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू. अरुण देवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, साखर पेठ पोलिस चौकी

लेखापरीक्षणनंतर कारवाई
संस्थेचे लेखापरीक्षण २०१२ पर्यंत झालेले आहे. पुढे शासकीय लेखापरीक्षण होण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव देणार. साधारण २९ लाख रुपये ठेवी आणि ३९ लाख रुपये कर्जे अशी संस्थेची आर्थिक स्थिती दिसून येते. कर्जवसुली होत नसल्याने ठेवीदारांची रक्कम मिळण्यात अडचणी आल्या. लेखापरीक्षणानंतर कर्जदारांची यादी तयार करण्यात येईल. त्यांच्याकडील दावे (कलम १०१) माझ्याकडे आले, की त्यावर लगेच निर्णय देईन. त्याने वसुली करणे शक्य होईल. दुसरी बाजू तपासताना संस्थेला आर्थिक नुकसान पोचवणारे जे कोणी असतील त्यांना दोषी ठरवून लेखापरीक्षकांमार्फत पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊ. यासाठी वेळ लागेल. त्यामुळे ठेवीदारांनी संयम बाळगून सहकार्य करावे. बी.एस. कटरे, शहर उपनिबंधक (सहकारी संस्था)