आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तुरचनेत प्रवेशद्वार महत्त्वाचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कुठल्याही वास्तुरचनेत प्रवेशद्वार अत्यंत महत्त्वाचे असते. त्यावरूनच वास्तूचे अंतरंग जाणवत असल्याने रचनाकारांनी प्रवेशाच्या नावीन्यपूर्ण कल्पना लढवाव्यात, असे ख्यातनाम वास्तुविशारद संजय मोहे यांनी शनिवारी येथे सांगितले.

दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या सोलापूर केंद्राच्या वतीने त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी वास्तुरचनाकारांसह विद्यार्थी, जिज्ञासू उपस्थित होते. देश-विदेशातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू दाखवत श्री. मोहे यांनी त्यांची रचना सांगितली. सिंगापूर येथील मोठे गृहप्रकल्प, बंगळुरू, पुण्यातील कॉर्पोरेट कंपन्यांच्या इमारती यांचे दाखले देत त्यांनी वास्तूतील प्रकाश आणि मोकळ्या वातावरणाची शास्त्रीय माहिती दिली.

श्री. मोहे पुढे म्हणाले, ‘पर्यावरणपूरक, निसर्ग सान्निध्य, हिरवळ अशा गोष्टींचा विचार वास्तुरचनाकारांनी करावा. मोकळ्या जागेचा वापर पर्यावरणाच्या विचारांपेक्षा व्यावसायिक विचार जादा होतात. मोकळ्या जागेत छोट्या-छोट्या गोष्टी साकारताना सामूहिक हितही साधले जावे, त्या दृष्टीने नावीन्यपूर्ण कल्पना पुढे आल्या पाहिजेत.’ या वेळी ख्यातनाम वास्तुरचनाकार विवेक कोटा, अमोल चाफळकर, सीमंतिनी चाफळकर, अजित हरिसंगम, बिल्डर्स असोसिएशनचे मल्लेश कावळे उपस्थित होते.

उद्या होणार वास्तू गप्पाचा कार्यक्रम

श्री. मोहे यांनी शनिवारी सोलापुरातील विविध वास्तू, हेरिटेज इमारती आणि ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. भुईकोट किल्ल्याचीही पाहणी केली. सायंकाळच्या व्याख्यानात देश-विदेशातील वास्तुंचे सादरीकरण केले. सोमवारी (दि 24) ते हॉटेल लोटसमध्ये सोलापुरातील वास्तुरचनाकारांशी संवाद साधणार आहेत. बदलती जीवनशैली आणि बदलत्या वास्तुरचनांबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत.