आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक सावित्री: पतीस किडनी दिल्याने कुटुंबाच्या ‘वडाला’ दीर्घायुष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सावित्रीने आपल्या पती सत्यवानला यमाच्या मगरमिठीतून सोडवून आणल्याची पौराणिक कथा अजरामर आहे. आधुनिक युगातही करमाळ्यातील स्वाती मसलेकर नामक एका सावित्रीने अपघातात जिवावर बेतलेल्या पतीला स्वत:ची किडनी देऊन नियतीवर ‘जित’ मिळविलेली आहे. वटपौर्णिमा साजरी करीत असताना आधुनिक काळातील जिद्दी स्वातीने पती अजित यांच्या ‘जित’साठी केलेल्या प्रयत्नांची कहाणी महिलांचे बळ वाढवणारी आहे.

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या स्वाती यांचा विवाह 1994 मध्ये अजित मसलेकर यांच्याशी झाला. सुखी समाधानी संसार फुलत असतानाच त्यांच्या जगण्यात जणू काटेच आले. 2010 मध्ये अजित मसलेकर शेताकडून घरी परतताना त्यांचा मोठा अपघात झाला. त्यातून त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. मसलेकर कुटुंबीयांसमोर त्यांच्यावरील उपचाराचे मोठे संकट उभे राहिले. करमाळ्याचे डॉ. संजय तोगरेकर यांनी कुटुंबीयांना धीर देत औषधोपचारासाठी यशोधरा अथवा पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी स्वाती मसलेकर यांना किडनी प्रत्यारोपणाचा उपचार सांगितला.

क्षणाचाही विचार न करता पतीच्या प्रेमापोटी स्वत:ची किडनी देण्याचा स्वाती मसलेकर यांनी निर्णय घेतला. त्यानुसार पती अजित मसलेकर यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. आपल्या सौभाग्याचे रक्षण आणि कुटुंबाचा आधारवड ‘जित’ ठेवण्यात स्वाती मसलेकर यांना यश मिळाले.

वटपौर्णिमेलाच शस्त्रक्रिया
सत्यवानाच्या सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत आणले होते, अशी पौराणिक कथा आहे. हा पौराणिक संदर्भ घेऊन ज्येष्ठ पौर्णिमेस भारतीय संस्कृतीत वटपूजनाचा उत्सव साजरा केला जातो. त्या सावित्रीचा वसा घेऊन स्वाती मसलेकर यांनी आपल्या पतीचे प्राण वाचण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशीच आपली किडनी दिली.

तिच्यामुळे सेकंड इनिंग
मी पूर्ण हताश झालो होतो. काही कळत नव्हते. मात्र, पत्नी स्वातीच्या अतुलनीय प्रेमानेच मी सहज जगण्याचा आनंद घेत आहे. पत्नी ही अनंत काळाची माता असते, हे वाक्य सिद्ध केले. माझ्या आईने मला जन्म तर पत्नीने नियतीच्या दाढेतून ओढून काढून जगण्याची ‘सेकंड इनिंग’ अनुभवण्याची संधी दिली.’’
अजित मसलेकर

उपयोगी आले हे सौभाग्य
प्रेमाच्या आणाभाका आणि सात जन्म साथ देईन, असे व्रत केवळ घेण्यासाठी नसते. ते निभावण्यासाठी असते. पती सुखी तरच माझे विश्व उभे राहणार आहे. आई, दीर विजय मसलेकर, मुलगा अनंत व बहिणी आणि संपूर्ण कुटुंबाने खूप धीर दिला.’’ स्वाती मसलेकर, पतीस मुत्रपिंड दान करणार्‍या महिला