आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरांचे राजीनामे, कर्मचारी झाले गायब, पंढरपुरात रुग्णांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह आणि सतरापैकी बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे आणि उर्वरित पाच वैद्यकीय अधिकारीही रजेवर गेल्याने गुरुवारी रुग्णांचे कमालीचे हाल झाले. डॉक्टरच नसल्यामुळे परिस्थिती नसतानाही अनेक गरीब रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागली. परिणामी संबंधितांनी पंढरपूर येथील डॉक्टरांचा हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज गायकवाड आणि अन्य बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाचे दुर्लक्ष काही लोकांच्या त्रासाला कंटाळून एक महिन्यापूर्वी शासनाकडे सामूहिक राजीनामे पाठवले होेते. यातच रुग्णालयातील एकूण सतरा पैकी जे उर्वरित पाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते तेही रजेवर गेले आहेत. या सर्वांनी दिलेल्या राजीनाम्याची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने सर्वांनी गुरुवारपासून कामावर जाण्याचा निर्णय घेतला.
डॉ. गायकवाड म्हणाले, ‘आम्ही राजीनामे पाठवलेले आहेत. प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. समाजकंटकांचाही मोठा उपद्रव आहे. त्यामुळे काम करणे अवघड होत होते. यावर प्रशासनाने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे अन्यथा निर्णयावर आम्ही ठाम आहोत.’
दरम्यान, डॉक्टर मंडळी अभावी रुग्णांचे आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकत नसल्याची उत्तरे ऐकावयास मिळाल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.

काही गरीब रुग्ण येथे वैद्यकीय सेवा मिळणार नसल्यामुळे रुग्णालयातून इतर रुग्णालयामध्ये अथवा घरी जात आहेत. रुग्णालयातील जनरल, महिला आणि पुरुष वाॅर्डातील बहुतांश खाटा मोकळ्या दिसत होत्या.
पूर्णपणे कोलमडली आहे वैद्यकीय सेवा
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे आणि अन्य पाच वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्यामुळे वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. डॉक्टरच नसल्यामुळे रुग्णालयामधील नर्सेस आणि इतर कर्मचारीही जागेवर नसल्याने जे रुग्ण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत त्यांची उपचाराअभावी चांगलीच हेळसांड होत आहे.
आज बैठक आयोजित
- पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर मंडळींनी दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी आमदार भारत भालके यांच्या बरोबर डॉक्टर मंडळींची शुक्रवारी बैठक आयोजिली आहे. त्यामध्ये तोडगा निघण्याची आशा आहे. सध्या रुग्णांच्या तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.
डॉ. गिरनार गवळी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय
खासगीत उपचार घेणार
- माझ्या आईला उपचाराकरता येथे आणले होते. डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे उपचार होणार नाहीत, असे कळाले. त्यामुळे आता पैसे भरण्याची परिस्थिती नसतानाही खासगी रुग्णालयात उपचाराकरता आईला घेऊन निघालो आहे.
धनाजी गायकवाड, फुलचिंचोली, ता. पंढरपूर
बातम्या आणखी आहेत...