आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमत्कार घडवणार - चार मतदारसंघात विठ्ठल परिवार घेणार एकसंध भूमिका : भालके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराने पंढरपूर, माढा, सांगोला आणि मोहोळ या चारही विधानसभा मतदारसंघात एकसंधपणे, एका विचाराने व एका भूमिकेने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल परिवार हा एकसंध आहे. 2009 मध्ये ज्याप्रमाणे हा परिवार एकत्रित राहिल्यामुळे पंढरपूर मतदार संघामध्ये जो चमत्कार घडला तसा चमत्कार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरबरोबरच शेजारील माढा, सांगोला आणि मोहोळ या मतदारसंघातून दाखवून देणार आहोत, अशी माहिती आमदार भारत भालके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माढा विधानसभा मतदारसंघातून कल्याणराव काळे तसेच राजूबापू पाटील यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात शासकीय विश्रामगृहामध्ये रविवारी आमदार भालके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. विठ्ठल परिवाराच्या बैठकीस सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, विठ्ठल कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, संचालक राजूबापू पाटील, मोहन कोळेकर, युवराज पाटील, अ‍ॅड. दिनकर पाटील, वसंतराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष गोरख ताड, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण मोरे, उपाध्यक्ष महादेव देठे, पांडुरंग कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नरसाप्पा देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने, माजी उपसभापती विजयसिंह देशमुख उपस्थित होते.

श्री. भालके म्हणाले, ‘पंढरपूर तालुक्याची विभागणी पंढरपूर, माढा, सांगोला आणि मोहोळ या चार विधानसभा मतदारसंघात झालेली आहे. विठ्ठल परिवारातील अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षांच्या, विचारांचे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एका विचाराने काम करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत आम्ही सर्वांनी घेतला आहे.’ वरील चारही विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल परिवारामधून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय अजून झालेला नाही. चारही विधानसभा मतदारसंघात विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या चारही मतदारसंघातून कोणाला आमदार म्हणून निवडून आणावयाचे हे आमचा विठ्ठल परिवारच ठरविणार आहे. महाडिकांचा भीमा परिवार हा विठ्ठल परिवारातीलच एक घटक आहे. त्यामुळे तोही आमच्या भूमिकेसोबतच राहणार आहे, असेही आमदार भारत भालके यांनी यावेळी सांगितले.
विचारविनिमय करून परिस्थितीप्रमाणे निर्णय घेणार
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील कार्यकर्त्यांशी, पदाधिका-यांशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, अन्य तीन विधानसभा मतदारसंघाबाबत अशा प्रकारे उमेदवार निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघात विठ्ठल परिवाराची ताकद कमी आहे तिथे अन्य कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय सर्वानुमतेच घेण्यात येणार आहे. विठ्ठल परिवारातील एका व्यक्तीला काँग्रेसकडून आणि दुस-याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर काय भूमिका राहणार या प्रश्नाला उत्तर देताना आमदार भालके म्हणाले, ‘याविषयी आताच बोलण्यापेक्षा ज्या त्या परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय घेऊन ते जाहीरपणे कळविले जाईल.’