आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यात शिंदे, साठे, सावंत हे पारंपरिक प्रतिस्पर्धी लागले प्रचाराला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यासह काँग्रेसचे युवा नेते दादासाहेब साठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय पाटील-घाटणेकर,पंढरपूरचे कल्याणराव काळे, भाजपचे राजकुमार पाटील तसेच शिवसेनेचे शिवाजी सावंत हे इच्छुक आहेत. प्रत्येक नेत्यांनी आपल्या परीने प्रचार सुरू केला आहे.
कुर्डुवाडी - माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी तालुक्यामध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर हायटेक प्रचार सुरू केला आहे. पंचायत समितीचे सभापती रणजितसिंह शिंदे व उपसभापती तुकाराम ढवळे यांनी माढा मतदार संघामध्ये समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावे व माळशिरस तालुक्यातील 14 गावांमध्ये गावभेटी बैठकीचा सपाटा सुरू केला आहे. तर पंढरपूर तालुक्यातील काँगे्रसचे नेते कल्याणराव काळे यांनी कार्यकर्त्यांसह माढा तालुक्यामध्ये गावभेटी सुरू केल्या आहेत. माढ्याचे काँग्रेस युवाचे माजी अध्यक्ष दादासाहेब साठे यांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनी राजकीय मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.

शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले शिवाजी सावंत यांनीही गावभेटी देत मतदान नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. शिवाय शिवसेनेत नुकत्याच आलेल्या उपळाईच्या उपसरपंच ज्योती कुलकर्णी यांच्याकडे महिला आघाडीप्रमुख पद दिले आहे. त्यांनीही माढा मतदारसंघामध्ये महिलांच्या शाखा स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुक्यातील बोरगावचे नेते राजकुमार पाटील यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निश्चय केला असून, प्रचारालाही सुरुवात केली आहे.
महायुतीत कोणाला सुटणार जागा
राष्ट्रवादीने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारास सुरुवात केली आहे. आमदार शिंदे यांच्या विकासकामांची व्हिडिओ फीत गावोगावी मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येत आहे. महायुतीतील घटक पक्षातील शिवसेनेचे शिवाजी सावंत, भाजपचे राजकुमार पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनी प्रचार सुरू केला असलातरी माढा मतदारसंघ कोणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान पंढरपुरातील कल्याणराव काळे यांना महायुतीतून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चाही रंगत आहे. गाव तेथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक अशा घोषणा देत शिवसेनेने जोमाने प्रचाराला प्रारंभ केला आहे.