आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच पक्षांना हव्यात जास्तीत जास्त जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आघाडी, युती, महायुती करून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी अंतिम टप्प्यात असतानाही अधिक जागांचा आग्रह अद्याप कमी झालेला नाही. प्रदेश पातळीवर वाटाघाटी झाल्या तरी स्थानिक पातळीवरचा दबावगट वाढवण्याचा प्रकारही त्यात दिसून येतो. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 11 जागा आहेत. त्यातील अधिकाधिक जागा पटकावण्यासाठी दावे अन् प्रतिदावे करण्यात येत आहेत. काहींनी मोर्चेबांधणी केली तर काही मंडळी शक्तिप्रदर्शन करून स्वत:ची ताकद दाखवत आहेत. काहींनी तर चक्क जागा मिळाली नाही तरी लढणारच, असा इशारा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दक्षिणसह आणखी दोन जागा मागणार : शहाजी पवार
शहर उत्तर, अक्कलकोट आणि माळशिरस या जागा भाजपकडे आहेत. या शिवाय आणखी 3 जागांची मागणी केली आहे. त्यात प्राधान्याने दक्षिण सोलापूरसह आणखी दोन जागा मागतो आहोत. त्या दोन जागा आताच सांगू शकत नाही. कारण त्या मिळण्यावर काही मातब्बर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. सध्या तीनच जागा असल्याने येणारी मंडळी थांबा व पाहाच्या भूमिकेत आहेत. जर 6 जागा मिळाल्या तर सहाही जागांवर मातब्बर उमेदवार देऊ, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सांगितले.
शिवसेना 8 जागांवर ठाम
शिवसेना शहर व जिल्ह्यातील 8 जागांची मागणी करणार आहे. यात शहर दक्षिण, शहर मध्य, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, माढा या ठिकाणी शिवसेना जागा मागणार आहे. उर्वरित जागांवर शहर उत्तर, अक्कलकोट, माळशिरस या ठिकाणी भाजपला जागा सोडली जाणार आहे. शिवसेना मात्र 8 जागांच्या मागणीवर ठाम आहे, असे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी सांगितले.

रिपाइं दोन जागा मागणार : सरवदे
महायुतीच्या माध्यमातून राज्यात एकूण 27 जागांची मागणी केली. सोलापूरच्या वाट्याला मोहोळ आणि माळशिरस या दोन आरक्षित जागा देण्याची मागणी केली. याबाबत प्राथमिक बोलणी झालेली आहे. या शिवाय आणखी काही मागण्याही महायुतीच्या बैठकीत मांडल्या आहेत. दोन दिवसांत त्यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे म्हणाले.

मनसे लढणार स्वबळावरच
आमचा पक्ष इतर पक्षांच्या मानाने तसा नवीन आहे. परंतु यंदाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. यंदाच्या विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठींकडे सोलापूर मध्य, दक्षिण, शहर उत्तर याबरोबर अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, करमाळा, बार्शी येथे मिळून एकूण 8 जागी उमेदवारांची मागणी केली आहे. त्यापैकी किमान 5 जागा येतील असा आत्मविश्वास आहे, असे शहराध्यक्ष युवराज चुंबळकर यांनी सांगितले.
काँग्रेसचा पंढरपूर-मंगळवेढ्यावर दावा : संतोष पाटील
काँग्रेसचे सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, बार्शी, सांगोला, शहर मध्य व शहर उत्तर या सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार असतीलच. आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, असा दावा आहे. त्यासाठी आम्ही प्रदेश काँग्रेसकडे मागणी केली. त्याचबरोबर करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत नाराजी आहे. तो मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात राहावा यासाठी मागणी केली असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितले.