सोलापूर - महापालिकेत पदाधिकारी होण्यासाठी पक्षातील नेत्यांकडे वारंवार विनंती करावी लागते. आपण पदासाठी योग्य दावेदार कसे, याबाबत बायोडाटा द्यावा लागतो. आपले वजन खर्च घालून पक्षांतर्गत विरोध शमवण्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. पण या सर्व बाबींना फाटा मिळाल्याचे पाहण्यास मिळाले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका खैरून्निसा शेख (सोडेवाले) यांना महिला व बालकल्याण सभापतिपद न मागता आणि नको म्हणत असताना देण्यात आले.
खैरून्निसा विडी कामगार आहेत. एका कामगार महिलेला सभापतिपद मिळाले, याचे श्रेय त्यांनी मतदारांनाच दिले. रिक्षाने येणार्या सोडेवाले आज महापालिकेच्या चार चाकी वाहनाने घरी पोहोचल्या. महापालिकेतील विविध प्रकारच्या सात विषय समिती सभापतिपदाच्या निवडी बुधवारी झाली. अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्रसिंह भोसले पीठासन अधिकारी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी बिनविरोध झाल्या.
कामे केल्यास पद मिळते
मी महिला व बालकल्याण सभापतिपद मागितले नाही. मला पक्षाने बोलवून पद दिले आहे. मला मतदारांनी निवडून दिल्याने मला सभापती होण्याचा मान मिळाला. याचे श्रेय मतदारांना आहे. काम करत राहिल्यास पदे आपोआप मिळतात. खैरून्निसा शेख, महिला व बालकल्याण सभापती