आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विडी घरकुलमध्ये अखेर मनपा शाळेची घंटा वाजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -हैदराबाद रोड येथील विडी घरकुलमध्ये शाळेसाठी महापालिकेने बांधलेल्या इमारतीत अखेर शाळेची घंटा वाजली. ही इमारत दुसर्‍यांच्याच ताब्यात असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने एप्रिल महिन्यात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शिक्षण मंडळाने मे महिन्यात ती इमारत ताब्यात घेतली आणि सध्या तेथे मुला-मुलींची सेमी इंग्रजी शाळा सुरू झाली आहे. बालवाडी, पहिली आणि दुसरी असे तीन वर्ग सुरू झाले आहेत.

काय आहे प्रकरण
पूर्वी विडी घरकुल ए ग्रुपमधील एका समाज मंदिरात बालवाडीचे वर्ग होत असत. काही लोकांनी विरोध केल्यानंतर हे वर्ग रविवार पेठेतील मनपा शाळेत हलवले. वर्ग दुसरीकडे नेल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली आणि वर्ग ओसाड पडले. विडी घरकुल बी ग्रुप, मारुती मंदिरच्या बाजूला मनपाने शाळेसाठी दोन खोल्या बांधल्या. 2012 मध्ये खोल्या बांधून पूर्ण झाल्या, पण तेथे शिलाई व्यवसाय सुरू झाला. नंतर तेथे मनपाचे कार्यालय सुरू झाल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीला आणले होते. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे यांनी ती इमारत ताब्यात घेतली. शाळा सुरू करण्यासंदर्भात जून महिन्यात शिक्षकांनी सर्व्हे केला. यानंतर 16 जून रोजी शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापालिका शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
देणगीदार, शिक्षिकांनी केली मदत
नवीन शाळा चांगली चालावी यासाठी समाजातील काही देणगीदारांनी विद्यार्थ्यांना दप्तर, शूज दिले तर दुर्गा सिद्धम या शिक्षिकेने स्वखर्चाने पाटी, लेखन साहित्य, आठ वह्या असे साहित्य दिले. महापालिका शिक्षण मंडळाने पुस्तके दिली असून येत्या दोन ते तीन दिवसांत गणेवश देण्यात येणार आहे.
सध्या शाळेत तीन वर्ग
दोन खोल्यांच्या या शाळेत सध्या बालवाडी, पहिली आणि दुसरीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. बालवाडी 25, पहिली 16 आणि दुसरी 6 अशी विद्यार्थी संख्या आहे. प्रवेश सुरू असून संख्या वाढण्याची शक्यता आहे.