आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaysinh Mohite And Sadabhau Khot News In Marathi, Madha, Solapur

मोहिते व खोत यांच्यात रंगणार कडवी लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडी - माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची मोठी ताकद आहे. या मतदार संघात खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते व महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्यात होईल. ऊसदर आंदोलनातून खोत यांचे नेतृत्व उभे राहिले आहे. माढा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे प्राबल्य आहे. त्यांचे पुत्र सभापती रणजितसिंह शिंदे हेही प्रचारात हिरीरीने उतरले आहेत. त्याचबरोबर मोहिते गटाचीही या तालुक्यात ताकद आहे. परंतु, संजय शिंदे यांची अनुपस्थितीतही तालुक्यात प्रकर्षाने जाणवते.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माढा लोकसभा मतदार संघामध्ये शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने केली आहेत. त्याचबरोबर महायुतीबरोबरच्या युतीमुळे येथे शेतकरीविरुद्ध साखरसम्राट असे स्वरूप या लढतीला देण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे मोहिते व खोत यांच्यात कडवी झुंज होईल. जनसेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह मोहिते हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी या मतदार संघातील विकासकामे व शेतकर्‍यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले आहेत. प्रतापसिंह मोहिते हे कार्यकर्त्यांबरोबर स्वत: सभा, फेर्‍या व गावभेटी करून दोघांना कडवी लढत देण्याचा प्रयत्न करीत आहेत. भ्रष्टाचार व शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आपच्या सविता शिंदे रिंगणात आहेत. गावभेटी, कॉर्नर सभा यावर ‘आप’चा भर आहे. त्यांनाही काही ठिकाणी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती, आघाडी व अपक्ष प्रतापसिंह मोहिते यांचा सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे. खरी लढत ही विजयसिंह आणि सदाभाऊ यांच्यातच आहे.


यांनी लावली हजेरी
तालुक्यात आघाडीकडून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील तसेच महायुतीकडून भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, रिपाइं नेते रामदास आठवले आदी नेत्यांच्या सभा झाल्या आहेत.


हे प्रश्न महत्त्वाचे
उसाला योग्य दर, सिंचन, पाणी, वीज, रस्ते, एमआयडीसी, उद्योग, आरोग्य, उच्च शिक्षण, मजुरांना रोजगार आदी प्रश्नांवर निवडणुकीचे मुद्दे फिरत आहेत.