आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaysinh Mohite Interview In Divya Marathi, Madha Lok Sabha Constituncy

मुलाखत: आरोप करण्याऐवजी माढय़ात काम करेन - विजयसिंह मोहिते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून काहीही साधले जात नाही. त्याऐवजी स्वत:च्या मतदारसंघात, विभागात भरीव कामे करण्यास मी प्राधान्य देतो. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा मतदारसंघात पाणी, वीजप्रश्नी मोठे काम केले आहे. मी ते पुढे नेईन आणि आणखी भरीव कामे करेन, असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना व्यक्त केला.

प्रश्न : प्रतिस्पर्धी उमेदवार आक्रमकपणे राष्ट्रवादी, साखर कारखानदार आणि तुमच्यावर आरोप करीत आहेत. याबद्दल काय सांगाल?
मी गेली 45 वर्षे राजकारणात आहे. कार्यकर्त्यांना माझा स्वभाव माहीत आहे. मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी भांडून मी माझ्या विभागाला जादा निधी घेत होतो. त्यातून राज्यभरात हजारो कोटींची कामे केली. आता सत्तेत नसतानाही सोलापूर, सातारा जिल्ह्यात जादा निधी मिळवून आणला. त्यासाठी आक्रस्ताळेपणा करण्याची गरज काय? प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते. मला कुणावर आरोप करणे आवडत नाही, लोकांना नावे ठेवून आपण मोठे होत नसतो. त्याऐवजी लोकांनी सांगितलेली चार कामे करण्यात वेळ घालविलेला बरा, असे मला वाटते. माझ्यासमोर एकूण 23 उमेदवार आहेत. या प्रत्येकाला मी स्पर्धक मानतो. एकट्या, दुकट्याचा इथे विषय नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, पण ती चांगल्या पद्धतीने लढवावी, असे माझे मत आहे.
प्रश्न : प्रतापसिंह यांच्या आरोपाबाबत?
मी त्याविषयी बोलणार नाही. मला बोलायचे नाही. मला लोकांची कामे करायची आहेत. आपण त्या विषयाला प्राधान्य देऊ.
प्रश्न : मतदारसंघात काही विषयांवरून नाराजी होती, ती दूर करण्यास वेळ लागला, याचा काय परिणाम होईल का?
वेळ लागला हे खरे आहे, अनेक गोष्टीत मी स्वत: लक्ष घालून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. नाराजीचा परिणाम होणार नाही. लोकांनी स्वत:हून मला त्यासंदर्भात विश्वास दिला आहे. तुम्ही दिवसभर पाहालच, लोक माझ्याकडे प्रश्न मांडतात आणि ते माझ्याकडून निकाली निघतील, असे बोलूनही दाखवितात.
प्रश्न : विकासाचा तुमचा अजेंडा काय?
सिंचन योजनांसाठी निधी खेचून आणणे, पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावणे, वीज कनेक्शन प्रश्न निकाली काढणे, औद्योगिक वसाहती उभारणे अशी अनेक कामे मी करणार आहे. माढय़ामध्ये शरद पवार यांनी मोठे काम केले आहे. मी ते पुढे घेऊन जाईन. नवी भरीव कामे करण्यास प्राधान्य राहील.