आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaysinh Mohite News In Marathi, Madha Lok Sabha Constituncy, Divya Marathi

विधानसभेच्या सत्तासंघर्षामुळे मोहिते यांची झालीय कोंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - माढा लोकसभा मतदारसंघातील माण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते यांच्या प्रचारार्थ गोपीनाथ मुंडे व शरद पवार यांच्या सभांमुळे प्रचाराचा वेग वाढला आहे. माणचे काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले आमदार जयकुमार गोरे यांनी तारसप्तकात आळवलेला नाराजीचा सूर मतदारांच्या कानावर परिणाम करतो की, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या तालावर मनाचा कौल ठरतो. यावर काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. विधानसभेची रंगीत तालीमवजा हा संघर्ष कायम राहिल्यास मोहिते यांच्या मताधिक्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.


माढा मतदारसंघात असलेल्या जिल्ह्यातील माण व फलटण या दोन्ही तालुक्यांत काँग्रेस आघाडीअंतर्गत धुसफूस आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार गोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी रामराजे, शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर यांच्यासोबत बैठक घेतली. त्यातून हा प्रश्न निकाली निघाल्याचे वाटले. परंतु पवार यांच्या सभेसहाठीच्या डिजिटल फलकावर दिसणारे आमदार गोरे प्रत्यक्षात व्यासपीठावर दिसलेच नाहीत. त्यांनी माणमध्ये विजयसिंह मोहिते यांच्या प्रचाराऐवजी सातारामधील उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराला प्राधान्य दिले. ते जाहीर नाराजी प्रकट करत नसले तरी प्रचारातही झोकून दिल्याचे दिसत नाही.


फलटण आणि म्हसवड नगरपालिकेवर अनुक्रमे रामराजे आणि गोरे यांचे वर्चस्व आहे. फलटणमध्ये विरोधी पक्षनेत्याला स्वतंत्र दालन नसल्याने काँग्रेसने केलेले आंदोलन आणि म्हसवडमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता म्हेत्रे यांना रात्रीतूनच त्यांच्या दालनातून हद्दपार केल्याच्या घटनांमुळे काँग्रेस आघाडीत दरी निर्माण झाली. त्याचा फटका मोहिते यांना बसण्याची चिन्हे आहेत. रामराजे यांच्या कार्यपद्धतीवर माण व खटावमधील काँग्रेसचा एक गट नाराज आहे. गोरे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह, चिमणराव कदम यांच्यासह अनेकांनी जाहीररीत्या असंतोष व्यक्त केला. माणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर जाहीर विरोध कमी झाला असला तरी असंतोष कायम आहे. असंतुष्ट अपक्ष प्रतापसिंह व महायुतीच्या खोत यांच्यामागे उभे राहण्याची चिन्हे आहेत. एक तर घरातून मोठा विरोध, दुसरा आघाडीत दूही आणि शरद पवारांच्या कर्तृत्वावर विसंबून पाच वर्षांपूर्वी त्यांना मतदान केलेल्यांचा भ्रमनिरास. या पार्श्वभूमीवर स्थानिक सोडून राष्ट्रीय प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर कसे जाणार हा पेचही मोहिते यांच्यासमोर आहे. या भागात पवारांची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. त्यामुळेही नाराजी आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलीय चिंता
आघाडीतील नाराजीचा तिढा वरवर सुटला असला तरी तो आतून धुमसत आहे. त्यातच दहिवडी येथे गोपीनाथ मुंडे यांच्या सभेला झालेली गर्दी आणि शरद पवार यांच्या सभेला मिळालेल्या अल्प प्रतिसादाने राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे. शरद पवार यांनी प्रतिनिधीत्व केलेला माढा लोकसभा मतदारसंघ कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला कष्ट उपसावे लागणार आहेत.