सोलापूर - माढा मतदारसंघात सर्वच पक्षाच्या वाड्या-वस्त्यांवरील बैठका, गावभेट दौरे, जाहीर सभा यामुळे प्रचाराचा धुराळा उडत आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्य़ा तंत्राचा वापर केला जात आहे. तर माढय़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांनी ‘हायटेक’ प्रचाराला सुरुवात केली आहे. यासाठी ‘ऑगमेंटेंड रिअँलिटी’ (आभासी वास्तव) हे ‘अँन्ड्रॉईड अँप्लिकेशन’ तयार करण्यात आले आहे.
विजयसिंह मोहिते यांच्यासाठी माढय़ाची निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी ‘मायक्रो प्लॅनिंग’ सुरू असल्याचे दिसते. राष्ट्रवादीच्या नाराज मंडळींना एकत्र आणणे, इतर पक्षीय नेत्यांची मोट बांधून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचे प्रयत्न आजअखेर सुरू आहेत. वाड्या-वस्त्या, गावागवांत जाऊन प्रचार केला जात आहे. दुसरीकडे ‘
फेसबुक’, ‘व्हॉट्स अँप’चा जोरदारपणे आधार घेतला जात आहे. हे करतानाच विजयसिंह यांचे प्रमुख शिलेदार धैर्यशील मोहिते यांनी ‘ऑगमेंटेंड रिअँलिटी’ हे अँप्लिकेशन तयार करून घेतले आहे. बारामतीच्या ‘स्टर्लिंग सिस्टीम’च्या सतीश पवार यांनी हे ‘अँप’ तयार केले आहे.
काय आहे ऑगमेंटेंड रिअँलिटी?
या अँपचे निर्माते सतीश पवार म्हणाले, ‘आभास आणि वास्तव या संकल्पनेच्या आधारे हे अँप तयार केले जाते. यापूर्वी मी विविध औषध कंपन्या, बांधकाम क्षेत्रातील दिग्गज लोकांसाठी हे अँप बनवून दिले होते. हॉलीवूड जगतात त्याचा सर्रास वापर होतो. आपल्याकडे ते नवे आहे.’
लोकांपर्यंत कामे पोहोचावीत..
विजयसिंहांनी सर्व घटकांसाठी कामे केली. आम्ही गावोगावी जाऊन लोकांना भेटतोच, पण हायटेक जमान्यातील लोकांपर्यंत त्यांची कामे पोहोचावीत, म्हणून हे अँप तयार केले आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आहे. धैर्यशील मोहिते, समन्वयक, प्रचार यंत्रणा
यावर होते हे कार्यरत
हे अँप लॅपटॉप, अँड्राइड मोबाइल, अँपल, टॅब्लेट, आयपॅड आदींवर कार्यरत होऊ शकते. त्यासाठी http://sterlingsys.com/vijaydada/ही लिंक देण्यात आली आहे.
यासाठी तयार केलाय एक खास पत्रक
विजयसिंह मोहिते यांच्या प्रचारासाठी एक खास पत्रक तयार करण्यात आले आहे. या पत्रकावर विजयसिंहांच्या विविध कामांची माहिती आहे. त्यांच्या एका फोटोखाली ‘अँप डाऊनलोड’ करण्यासाठी एक लिंक दिलेली आहे. ‘अँप डाऊनलोड’ झाल्यानंतर विजयसिंहांच्या फोटोसमोर मोबाइल धरला की एक व्हिडिओ सुरू होतो. त्यानंतर त्यांच्या विकासकामांची माहिती मिळते.