आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaysinh Mohite News In Marathi, Nationalist Congress, Divya Marathi

एक दिवस विजयसिंह बरोबर: वेळेच्या बाबतीत दक्ष असल्याने अनेक ठिकाणी साधतात संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - रविवार, सकाळी पावणेसातची वेळ. स्थळ- अकलूज, शिवरत्न बंगल्याचा परिसर. बंगल्यात कार्यकर्त्यांची वर्दळ आहे. हिरवळीवर काही कार्यकर्ते बसले आहेत. बंगल्यात गेल्यानंतर समोरच एका खोलीमध्ये धनाजी आसबे आणि त्यांचे सहकारी विजयसिंहांच्या दौर्‍याबद्दल दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांना माहिती देत आहेत. ‘दादा आठ वाजेपर्यंत पोहोचतील, तुम्ही तयार राहा, आचारसंहितेचा कुठेही भंग होऊ नये याची काळजी घ्या’, असे सांगत आहेत. आम्ही हॉलमध्ये प्रवेश करतो, तोच एका खुर्चीवर विजयसिंह मोहिते बसलेले दिसतात. समोरील सोफ्यावर कार्यकर्ते दाटीवाटीने बसले आहेत. आम्हाला पाहून विजयसिंह म्हणतात, ‘बसा आपण लवकर निघू, म्हणत कार्यकर्त्यांशी चर्चा करू लागतात’.


सव्वासातपासून दिनक्रमास आरंभ
सव्वासात वाजता विजयसिंहांच्या प्रचार दिनक्रमाला सुरुवात होते. पंढरपूर गाडीमध्ये आमचा प्रश्न-उत्तरांचा सिलसिला सुरू होतो.. आपला दिनक्रम कसा असतो? विजयसिंह सांगतात की.., दररोज सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडतो. घरी परतायला रात्रीचे साडेअकरा, बारा वाजतात. दिवसातून दोन-तीन वेळा आमदार, कार्यकर्ते यांच्याकडून ठिकठिकाणी काय सुरू आहे याची माहिती मिळते. पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे गाड्यांचा ताफा पोहोचला. गावातील मंदिरासमोर मोठी सभा झाली. सभेत त्यांनी संवाद साधला. उंबरे गावानंतर करकंबमध्ये सभा झाली. शिवाणी पलंगे दहावीच्या मुलीचे भाषण लक्षेवधी ठरले.


करकंबला घेतले सर्वांनी स्नेहभोजन
करकंबची सभा आटोपल्यानंतर नेते मंडळी एक वाजता जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या घरी स्नेहभोजनासाठी पोहोचले. यानंतर नरसप्पा देशमुख यांच्या घरी एका वृत्तवाहिनीने विजयसिंहांची दीर्घ मुलाखतही घेतली.
यानंतर विजयसिंहांचा ताफा करकंब गावातील विजयकुमार शहा यांच्या घरी पोहोचला. दोन दिवसांपूर्वी शहा यांच्या घरी पद्मजादेवी मोहिते येऊन गेल्या होत्या. शहा यांच्या घरी ते केवळ 10 मिनिटे बसले. घरातील काही लोकांनी नुकतेच, वहिनीसाहेब येऊन गेल्याचे सांगितले. त्यांच्याकडे पाहून विजयसिंहांनी स्मितहास्य केले. करकंबनंतर सुस्ते गावी पोहोचतो. तिथे सभेस परवानगी नाही. त्यामुळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घाडगे यांनी एक बैठक आयोजित केली होती. सुस्तेहून गाड्यांचा ताफा नातेपुतेकडे निघाला.