आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaysinh Mohite News In Marathi, Nationalist Congress, Prithiviraj Chavan, Divya Marathi

मुख्यमंत्र्यांचा मान राखून मोहितेंच्या प्रचारात उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज/ सातारा - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आदेश टाळून पुढे जाण्याची आमची बिशाद नसल्याचे सांगत काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले आमदार जयकुमार गोरे व काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते यांच्या प्रचारात सक्रिय होण्याची ग्वाही दिली. दहिवडी (ता. माण) येथे बुधवारी आमदार गोरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते.
अनेक दिवसांपासून निंबाळकर, आमदार गोरे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश दिले. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयसिंह मोहिते यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. आघाडीचा धर्म पाळून त्यांना जादा मताधिक्य द्यावे, असा माझा स्पष्ट आदेश आहे. तसेच महायुतीच्या आव्हानाला पूर्णपणे थोपवण्यासाठी मी आणि शरद पवार एकत्र काम करीत आहोत.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘विजयदादा तुम्ही खासदार झाल्यानंतर माढा मतदार संघातील दोन्ही काँग्रेसमधील वडीलभाऊ या नात्याने अडचणी दूर करा. येथील जनता आपल्यावर मतांचा पाऊस पाडेल. या निवडणुकीत जातीयवादी पक्षांचे आव्हान थोपवण्यासाठी मी, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते विशेष दक्ष आहोत. येथील विकास व पाणी प्रश्नावर यापुढे राजकारण होणार नाही यासाठी दोन्ही काँग्रेसचे नेते लक्ष घालतील. दोन्ही काँग्रेसमधील सध्याच्या समन्वयामुळे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात आम्हाला भरघोस यश मिळणार आहे.
मोहितेंना आमचा विरोध नव्हता : विजयसिंह मोहिते यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नव्हता. विरोध असण्याचे कारणही नाही. विरोध राष्ट्रवादीच्या सातार्‍यातील नेत्यांना आहे, असे आमदार जयकुमार गोरे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाचा मान राखून आम्ही मोहिते यांचा प्रचार करणार असल्याचे गोरे व निंबाळकर यांनी स्पष्ट केले. या वेळी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, काँग्रेस नेते सुरेंद्र गुदगे उपस्थित होते.